पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांच्या मागणीला यश: वाहनधारकांना दिलासा..
⚡सावंतवाडी ता.०४-:
सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील मळगाव घाटीत वाहतुकीस अत्यंत धोकादायक ठरणार्या झाडांच्या फांद्या अखेर आज वनविभागाच्या वतीने क्रेनच्या साहाय्याने तोडण्यात आल्या. पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी नुकतीच पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ही झाडे हटवण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची वनविभागाने तात्काळ दखल घेत ही मोहीम राबविल्याने, गावकर यांनी वनविभागाच्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील मळगाव घाटीत दोन्ही बाजूंना वनविभागाच्या हद्दीतील झाडे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आली आहेत. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ही झाडे रस्त्यावर कोसळण्याची मोठी शक्यता असते. यापूर्वीही अनेकदा येथे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठा अपघात झाला नसला, तरी ही झाडे प्रवाशांसाठी सदैव टांगती तलवार ठरत होती. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन जितेंद्र गावकर यांनी ही धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी हटवावीत, अशी मागणी सभागृहात केली होती. तसेच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवरील वाढलेली झाडीही साफ करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या मागणीनंतर आज वनविभागाच्या पथकाकडून मळगाव घाटीतील धबधब्याच्या वरच्या बाजूने वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या क्रेनच्या साहाय्याने तोडण्यात आल्या. ही मोहीम पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या उपस्थितीत पार पडली. गेल्या वर्षीही वनविभागाने अशाच प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यावर्षीही पावसाळा तोंडावर असताना ही मोहीम वेळेत हाती घेतल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित झाल्याची भावना चालकांमधून व्यक्त होत आहे.
घाटीमध्ये अजूनही अनेक झाडे मोठ्या प्रमाणात धोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात किंवा अतिवृष्टीदरम्यान ही झाडे मुळासकट उपटून रस्त्यावर येऊ शकतात. त्यामुळे वनविभागाने या संपूर्ण घाटातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्व्हेक्षण करावे आणि ती झाडे सरसकट तोडून कायमस्वरूपी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आपण पुन्हा एकदा वनविभागाकडे करणार असल्याचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी यावेळी म्हटले.
