एसी कॉम्प्रेसर’सह दोघांना पोलिसांनी पकडले…
⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडीतील एका हॉटेला चोरांनी लक्ष केलं असून. येथील वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. काल रात्रीची गस्त घालत असताना पोलीस पथकाने आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका संशयास्पद वाहनाला पकडून मोठी कारवाई केली. संशयास्पदरीत्या ‘एसी कॉम्प्रेसर’ घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास ‘तीन मूशी’ परिसरामध्ये पोलीस हवालदार कोरगावकर आणि सुरेश पाटील हे नेहमीप्रमाणे रात्रकालीन गस्तीवर होते. यादरम्यान त्यांना एका वाहनाची हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांनी तात्काळ तत्परता दाखवत सदर वाहन थांबवले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ‘एसी कॉम्प्रेसर’ आढळून आला. गस्तीवरील पोलीस हवालदार कोरगावकर आणि सुरेश पाटील यांनी वाहनातील तरुणांकडे या मालाबाबत आणि तो कुठे घेऊन जात आहेत, याविषयी कसून चौकशी केली. मात्र, या दोन्ही तरुणांना आपल्या ताब्यातील या महागड्या मालाबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण किंवा वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत. हा माल चोरीचा किंवा संशयास्पद असल्याचा दाट संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात उमेश नाईक (वय ३१, राहणार – माणगाव कालेली), सोहम पिळणकर (वय १९, राहणार – सालईवाडा, सावंतवाडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश पाटील हे करत असून, हा माल त्यांनी कुठून आणला आणि ते तो कुठे घेऊन चालले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. पहाटेच्या वेळी सतर्कता दाखवून ही कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
