तपासाअंती मुलगा त्याच्या पालकांच्या स्वाधीन..
⚡मालवण ता.०३-:
मालवण येथील भरड परिसरात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना सुमारे दीड वर्षांचा एक चिमुकला मुलगा कुत्र्यांच्या गराड्यात एकटाच फिरताना सापडून आल्याने मालवणात एकच खळबळ उडाली. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी या बालकाला मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करत बालकाच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामध्ये मालवणवासियांनीही आपापल्या परीने शोधकार्य राबविले. तपासाअंती हा बालक मालवण एसटी स्टॅन्ड परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सर्व खात्री केल्यावर या बालकाला सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात दिल्यावर मालवण वासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आज पहाटे भरड परिसरात काही नागरिक मॉर्निंग वॉक निमित्त फेरफटका मारत असताना त्यांना अंधारात एक दीड वर्षाचा मुलगा कुत्र्यांनी घेरलेल्या अवस्थेत फिरताना आढळून आला. हे दृश्य पाहून नागरिकांनी कुत्र्यांना हटकत बालकाची कुत्र्यांपासून सुटका केली. सुदैवाने, कुत्र्यांनी घेरलेले असतानाही त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आणि तो सुखरूप वाचला. मात्र, घटनेने धक्का बसलेल्या नागरिकांनी तातडीने मालवण पोलीसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या चिमुकल्याला ताब्यात घेत सुरक्षेचा उपाय म्हणून वैद्यकीय तपासणीसाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यानंतर या मुलाची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र भरड परिसरात लहान मुलगा सापडल्याचे वृत्त मालवणात पसरताच सर्वांकडून चिंता व्यक्त होऊ लागली. हा लहान मुलगा भरड परिसरात कसा पोहोचला आणि त्याचे माता-पिता कोण आहेत याबाबत तर्क वितर्क व्यक्त होऊ लागले. मालवण पोलिसांकडून याबाबत कसून शोध सुरू करण्यात आळा होता. पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तसेच स्थानिक नागरिकांकडूनही माहिती गोळा करण्यात येत होती. या शोधकार्यात नागरिकांनीही सहकार्य केले. संबंधित मुलाच्या पालकांनी, नातेवाईकांनी किंवा त्याला ओळखणाऱ्या कोणत्याही नागरिकाने तात्काळ मालवण पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही मालवण पोलिसांनी केले आहे. हा तपास सुरु असताना अखेर सात तासानंतर हा मुलगा मालवण एसटी स्टॅन्डच्या मागील परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय कामगार कुटुंबाचा असल्याचे स्पष्ट झाले. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना मुलगा बाहेर गेला अशी माहिती समोर आली. मालवण पोलिसांनी सर्व खातरजमा करून त्या मुलाला त्याच्या आईकडे स्वाधीन केले. त्यामुळे शहरातील चर्चेला पूर्णविराम मिळून शहरवासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
