प्रवीण भोंसले यांच्यासह शिष्टमंडळाची कार्यकारी अभियंता इंगवले यांची भेट घेऊन केली मागणी:इस्टिमेट तयार करून जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्याचे दिले आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.०२-: तिरोडा खासेवाडी येथील लोखंडी साकव दरवर्षी दुरुस्त करावा लागत असल्याने या ठिकाणी नवीन साकव उभारण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, तिरोडा सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच संदेश केरकर व नानोस सरपंच साक्षी शेट्ये यांनी आज संध्याकाळी निर्माण भवन सावंतवाडी येथे कार्यकारी अभियंता इंगवले यांची भेट घेऊन केली.
तिरोडा, नानोस, रेड्डी तसेच शिरोडा येथील ग्रामस्थ या साकवाचा सातत्याने वापर करीत असून विद्यार्थ्यांना शिरोडा हायस्कूलला जाण्यासाठी, जिल्हा ग्रामीण रुग्णालयात जाणे, बाजारपेठ, शेती तसेच दैनंदिन कामकाजासाठी हा साकव अत्यंत महत्त्वाचा असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.
यावर कार्यकारी अभियंता इंगवले यांनी संबंधित साकवाचे इस्टिमेट तयार करून जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच उपअभियंता पाटील हे इस्टिमेट तयार करतील, अशी सूचनाही त्यांनी केली.
दरम्यान, साकवाच्या प्रस्तावापूर्वी साकवाकडे जाणारा मार्ग ग्रामपंचायतीने रेकॉर्ड क्रमांक २३ मध्ये नोंद करणे आवश्यक असल्याचेही कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले. अन्यथा साकवाचा प्रस्ताव सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडे पाठविता येणार नसल्याची माहिती त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
जिल्हा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल व योग्य मार्गदर्शनाबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
