भारती मोरे यांची मागणी: प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी..
⚡सावंतवाडी ता.०२-: पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील शिरोड नाका व मोर डोंगरी परिसरातील गटारे अद्याप साफ करण्यात आलेली नाहीत. परिसरातील प्रत्येक कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन गटारे व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी माजी नगरसेविका तथा शिंदे शिवसेनेच्या महिला शहर अध्यक्षा भारती मोरे यांनी केली आहे.
पावसाळा जवळ आला असतानाही आवश्यक स्वच्छता कामे होत नसल्याने आरोग्य विभाग नेमके काय करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
