ठाकरे सेना आणि युवसेनेचा उपक्रम:आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच औचित्य..
⚡कुडाळ ता.०१-: घटत चाललेली भूजल पातळी आणि भविष्यात उदभवणारा पाणी टंचाईचा धोका ओळखून ठाकरे सेना आणि युवा सेना कुडाळ शहरात आगळावेगळा उपक्रम राबविणार आहेत. भूजल पातळी वाढवुन ती टिकवून ठेवणारी सुमारे ५ हजार झाडं शहरातील घराघरात शिवसैनिक स्वतः येऊन लावून देणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून येत्या १३ जून पासून या ‘आमची हाक तुमचा प्रतिसाद’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेच्या माध्यमातून ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ ही एक अनोखी आणि आधुनिक योजना राबवण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी मंदार शिरसाट यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राजन नाईक, संतोष शिरसाट, कृष्णा धुरी आदी उपस्थित होते.
श्री. शिरसाट म्हणाले, यासाठी एक विशेष QR कोड जनरेट केला जाणार असून तो कुडाळमधील जनतेपर्यंत पोहोचवला जाईल. नागरिकांनी हा QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करायची आहे. आपल्याला आपल्या परिसरासाठी कोणते झाड हवे आहे, याची माहिती तिथे नोंदवल्यास थेट शिवसैनिक तुमच्या अंगणात येऊन ते झाड लावून देणार आहेत.
या मोहिमेत जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करणाऱ्या विशेष वृक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने बेल, आवळा, करंज, मोहजनी, बहावा, चिंच, कुसुमी, कांचन या झाडांचा समावेश आहे.
श्री. शिरसाट म्हणाले, आपल्या आधीच्या पिढीने काही चांगल्या गोष्टी केल्या म्हणून आज आपण स्वच्छंदी जीवन जगत आहोत. म्हणूनच आपणही येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी देणं लागतो, या भावनेतून हा उपक्रम केला जात आहे.
केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर कुडाळमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी युवासेनेने ठोस पावले उचलली आहेत. यासाठी दोन प्रमुख मागण्या केल्या जाणार आहेत. पहिली मागणी म्हणजे, शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे. कुडाळमधील शासकीय आणि निमशासकीय शाळांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, या उद्देशाने युवासेनेचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. दुसरी मागणी अशी आहे की, नगरपंचायतीकडे कडक अंमलबजावणीची मागणी करणार आहोत. कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन, नवीन इमारतींना परवानगी देताना ज्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, त्यांनाच ‘ऑक्यूपेन्सी सर्टिफिकेट’ (भोगवटा प्रमाणपत्र) देण्यात यावे, अशी मागणी केली जाईल.
तसेच, ज्या घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यरत असेल त्यांना घरपट्टी मध्ये १० टक्के करसवलत देण्याचा शासनाचा जीआर (GR) आहे. या जीआरची कुडाळमध्ये काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही सीईओ यांच्याकडे केली जाणार आहे.
या सर्व उपक्रमांचा शुभारंभ व कार्यक्रम माजी खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. कुडाळकरांनी या पर्यावरण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला परिसरा हिरवागार करावा, असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.
