डॉ. प्रवीणकुमार ठाकरे:हिंदू एकतेचा जागर : मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न..
⚡सावंतवाडी ता.०१-: अमुक एका जातीची ओळख जपण्यात न अडकता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत, असे ठाम प्रतिपादन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले. मळगाव येथे आयोजित सकल हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडलेल्या या संमेलनाचे आयोजन हिंदू संमेलन समन्वय समिती मळगाव दशक्रोशी यांच्यावतीने करण्यात आले होते. हिंदू बांधवांमध्ये एकजूट निर्माण व्हावी, धर्मजागृती व्हावी आणि भावी पिढीपर्यंत संस्कार पोहोचावेत, हा या संमेलनाचा प्रमुख हेतू होता.
दीपप्रज्वलन व शिवप्रतिमेस व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह. भ. प. श्री लक्ष्मण कडव, हिंदू संमेलन समन्वय समितीचे संयोजक शेखर पाडगावकर, सहसंयोजिका रंजना तेली, महेश पंतवालावलकर, हेमंत खानोलकर, भगवान रेडकर, मनीषा नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ. ठाकरे तसेच प्रमुख पाहुणे लक्ष्मण कडव यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, “धर्मसंरक्षणाची सुरुवात आपल्या गावापासूनच झाली पाहिजे. समाजात वाढणाऱ्या अपप्रवृत्तींपासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची आहे. शिवरायांना अपेक्षित असलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केली. ‘नागरिक मी या देशाचा’ या कवितेचे वाचन करताना आपल्या अपेक्षा आणि कृतीतील विसंगती त्यांनी नेमकेपणाने अधोरेखित केली. भाषणाच्या समारोपात उंदराच्या रूपककथेतून “एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू” हा संदेश दिला.
प्रास्ताविकात शेखर पाडगावकर यांनी जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगण्याचा संदेश दिला. लक्ष्मण कडव यांनी भगवद्गीतेचे महत्त्व विशद करत ती प्रत्येक हिंदूच्या घरात असावी व नियमित वाचनात असावी, असे सांगितले.
कार्यक्रमास नावनोंदणी व अल्पोपहाराने सुरुवात झाली. सांस्कृतिक सादरीकरणात गायक हेमंत गोडकर व मुग्धा पंतवालावलकर यांचे सुगम संगीत, अंकुश आजगावकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, तसेच हर्षिता राऊळ व खुशी लातये यांचे मर्दानी लाठी-काठी प्रात्यक्षिक सादर झाले. दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांच्याकडून शिवकालीन शस्त्रे व पुस्तकांचे प्रदर्शनही मांडण्यात आले. सर्व सहभागींचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन मनीषा नाटेकर-राऊळ यांनी तर आभार प्रदर्शन रंजना तेली यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाला हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी शिवकालीन शस्त्रे व पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेतला. या सकल हिंदू संमेलनाच्या यशस्वीतेसाठी हिंदू संमेलन समन्वय समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
