खून की अपघात? पोलीस तपास सुरू…
दोडामार्ग, : दोडामार्ग-बेळगाव मार्गावरील तिलारी घाट परिसरात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तिलारी घाटातून जाणाऱ्या काहीजणांना रस्त्यालगतच्या झुडपांमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता झाडाझुडपांमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती तात्काळ चंदगड पोलिसांना देण्यात आली.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह बराच काळ जंगलात पडून असल्याने तो मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, महिलेने हिरव्या रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज तसेच पायात चप्पल घातलेली होती. या वर्णनाच्या आधारे तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिलेचा मृत्यू अपघाती झाला की तिचा घातपात करण्यात आला, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत.
चंदगड पोलिसांनी अज्ञात महिलेची ओळख पटविण्यासाठी तसेच मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
