⚡दोडामार्ग ता.३०-: आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या कथित खनिजयुक्त माती चोरी आणि बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोरच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात संबंधित महसूल व पोलीस यंत्रणेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे निदर्शनास आणून देत शिवसेना शिष्टमंडळाने कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आडाळी एमआयडीसी परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त लाल मातीचे उत्खनन करून ती बाहेर नेली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर दोडामार्ग शिवसेना आक्रमक झाली होती. तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता अनेक ठिकाणी डोंगर कापल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन, छायाचित्रे व अन्य पुरावे सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख बाबाजी (दादा) देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, सासोली सरपंच बळीराम शेट्ये, विलास सावंत, विशांत तळवडेकर, सुनील गवस तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांसमोरच जिल्हाधिकाऱ्यांना फोन…….
शिवसेना शिष्टमंडळाने मांडलेले मुद्दे आणि सादर केलेले पुरावे पाहिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच संबंधित महसूल व पोलीस यंत्रणेच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
अवैध उत्खननाला संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी…..
आडाळी एमआयडीसीमध्ये रात्री-अपरात्री जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यात येत असून डंपरद्वारे तिची वाहतूक केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याबाबत पोलीस आणि महसूल प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने संबंधित यंत्रणांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यामुळे केवळ उत्खनन करणाऱ्यांवर नव्हे तर त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासन झोपले होते काय ?….
एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी जागेतील मातीची चोरी आणि वाहतूक सुरू असताना प्रशासनाला त्याची कल्पना नव्हती का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. अनेक वर्षे हा प्रकार सुरू असूनही कारवाई झाली नाही, यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद होते, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले.
सात-आठ वर्षांनंतरही एकही उद्योग नाही….
शिवसेना शिष्टमंडळाने उद्योगमंत्र्यांसमोर आडाळी एमआयडीसीचा रखडलेला विकास हा देखील प्रमुख मुद्दा मांडला. दोडामार्ग तालुक्यातील युवकांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या एमआयडीसीला सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी अद्याप एकही मोठा उद्योग सुरू झालेला नाही. एमआयडीसीतील मूलभूत सुविधा आणि सबस्टेशनची कामेही पूर्ण झालेली नसल्याने गुंतवणूकदार पुढे येत नसल्याची बाब उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
युवकांना रोजगार द्या…
एमआयडीसीचा उद्देश स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र आजही शेकडो युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रलंबित पायाभूत सुविधा तातडीने पूर्ण करून आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी शासनाने विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्रीन झोनचा शिक्का हटवण्याची मागणी…..
शिवसेना शिष्टमंडळाने आडाळी एमआयडीसीसमोरील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उद्योगमंत्र्यांसमोर मांडला. सदर एमआयडीसी ग्रीन झोन म्हणून मंजूर झाल्याने अनेक उद्योगांना आवश्यक परवानग्या मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार या भागात येण्यास टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आडाळी एमआयडीसीवरील ग्रीन झोनचा शेरा हटवून ती खुली (ओपन) करण्यात यावी, अशी ठाम मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच महावितरणचे काम काही जणांकडून रोखले गेले असल्याने तिथे अजून वीज सेवा कार्यान्वित झाली नाही आहे त्यामुळे ते काम पोलिस प्रोटेक्शन घेऊन काम तात्काळ सुरू करावे अशी देखील मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावरही मंत्री सामंत यांनी सकारात्मकता दाखवत येणाऱ्या काळात तेही काम पूर्ण केले जाईल असे सांगितले.
एमआयडीसी प्राधिकरणाचीही चौकशी करा….
खासगी जमिनीवरील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने संबंधितांवर कारवाई केली होती. त्याच धर्तीवर एमआयडीसीच्या जागेत झालेल्या उत्खननाबाबत एमआयडीसी प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
आता सर्वांचे लक्ष कारवाईकडे….
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः हस्तक्षेप करून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्याने आडाळी एमआयडीसीतील कथित खनिज चोरी प्रकरणात पुढील दिवसांत नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण दोडामार्ग तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
