दारू, ड्रग्ज, गो-तस्करीपासून भ्रष्टाचारापर्यंत आरोपांची सरबत्ती…

“सिंधुदुर्ग पोलिस प्रशासन गुन्हेगारांच्या दावणीला..?”आ. निलेश राणे यांचा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर थेट हल्लाबोल..

ओरोस ता ३०
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती दारूतस्करी, अमली पदार्थांचा पुरवठा, गो-तस्करी, अवैध धंद्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “जिल्ह्याचे मोठे नुकसान होत असून गुन्हेगारांना अभय मिळत आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी दहिकर यांच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि खासदारांकडे करणार असल्याचे जाहीर केले.
सिंधुदुर्ग नगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन मध्ये आमदार राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा परिषद सदस्य केशव नारकर तसेच जिल्हा बँक संचालक संदीप परब आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ राणे म्हणाले, “मोहन दहिकर यांनी २२ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल असून त्यातील अनेक प्रकरणांत दोषसिद्धीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.” गोवा बनावटी दारूची तस्करी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेला मोठा शाप असल्याचे सांगताना राणे म्हणाले की, गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारू जिल्ह्यात आणली जाते. मात्र या वाहतुकीवर प्रभावी कारवाई होत नाही. जी दारू पकडली जाते ती बहुतांश वेळा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात पकडली जाते. सिंधुदुर्गात मात्र पोलिस अधीक्षकांच्या कार्यकाळात एकदाही मोठी कारवाई झालेली दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
अमली पदार्थांच्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी गांजा आणि ड्रग्ज विक्री विरोधातील कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लहान-मोठ्या आरोपींना पकडले जाते; मात्र मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलिस पोहोचत नाहीत. दुसऱ्याच दिवशी आरोपी सुटून बाहेर येतात. पुरवठ्याची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक तपास होताना दिसत नाही,” असे ते म्हणाले. दोडामार्ग तालुक्यातील रबर शेतीच्या नावाखाली गांजाची लागवड होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. सुमारे १८०० हेक्टर क्षेत्र रबर लागवडीखाली असून तेथे स्थानिकांनाही सहज प्रवेश मिळत नसल्याचे सांगत पोलिसांनी त्या भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
गो-तस्करीच्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले की, जिल्ह्यात बेकायदा गोमांस विक्री व गो-तस्करीबाबत सर्वांनाच माहिती आहे; मात्र प्रभावी कारवाई होत नाही. तसेच ध्वनिक्षेपकांबाबत तक्रारी करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील काही अधिकाऱ्यांवरही राणे यांनी थेट आरोप केले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांतून कथित हप्ते गोळा करण्याचे काम काही अधिकारी करत असल्याचा दावा त्यांनी केला. काही विशिष्ट वाहनांद्वारे गोव्यातून दारूची वाहतूक होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

You cannot copy content of this page