⚡सावंतवाडी, ता.२९-: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड एनएबी सिंधुदुर्ग, भटवाडी-सावंतवाडी यांच्या वतीने नेत्र रुग्णालयासाठी नेत्र तपासणी वाहन प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या वाहनाचे उद्घाटन सौ. सीमा अनंत उचगावकर (मिशाळ) यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, तर कोल्हापूर येथील उद्योगपती श्री. मोतीराम मिशाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी अंध लाभार्थी अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे, सचिव सोमनाथ जिगजीनी, श्री. उत्तम धुरी, श्री. शिवकुमार उचगावकर, अॅड. प्रकाश परब, डॉ. सुहास नायडू, श्री. आबासाहेब कशाळीकर, श्री. दिलीप म्हापसेकर, श्री. कांबळेसर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यानंतर दृष्टी बाधितांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी लाभार्थ्यांनी NAB संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. गेली ३५ वर्षे संस्था दृष्टी बाधितांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देत असल्याचे वक्त्यांनी सांगितले. “सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही दृष्टी बाधित व्यक्ती भीक मागताना दिसत नाही, ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे मत लाभार्थ्यांनी व्यक्त केले.
श्री. अनंत उचगावकर यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही उद्योगशील व स्वावलंबी बनलो असून NAB संस्थेचे आम्ही कायम ऋणी आहोत, अशा भावना अंध लाभार्थी श्री. राजेंद्र मेस्त्री, बाबुराव गावडे, अनिल शिंगाडे, काशीबाई पाटील, शेखर आळवे आदींनी व्यक्त केल्या.
उद्घाटक सौ. सीमा अनंत उचगावकर यांनी NAB संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उद्योगपती श्री. मोतीराम मिशाळ यांनीही संस्थेच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक करत भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी संस्थेला रुपये ५१ हजारांची देणगी जाहीर केली. तसेच अॅड. प्रकाश परब यांनी रुपये १० हजारांची देणगी जाहीर केली. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
समारंभात दृष्टी बाधित लाभार्थ्यांना टी-शर्ट व साड्यांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. मोतीराम मिशाळ यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला, तर सौ. सीमा उचगावकर यांनाही भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमानंतर सहभोजनाने स्नेहमेळाव्याची सांगता झाली.
