कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्यलेखन स्पर्धा…

विजेत्या कवीला 10 हजारांचे पारितोषिक ;समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचा उपक्रम..

⚡कणकवली ता.२८-: कामगार – श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणारे क्रांतिकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेस ‘नारायण सुर्वे पारितोषिक’ म्हणून 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करण्यात येणार आहे.

नारायण सुर्वे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत या गावचे सुपुत्र. मुंबईच्या गिरणगावात हमाली करणाऱ्या, रस्त्यावर झोपणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहिरनामा’ यांसारख्या संग्रहांतून त्यांनी शोषितांच्या वेदनेला क्रांतीची धार दिली. श्रमिकांचे जीवन, मुंबईची झोपडपट्टी, भुकेलेले जग आणि व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता. त्यामुळेच त्यांना ‘क्रांतिकारी कवी’ म्हणून ओळखले जाते. पद्मश्री, कबीर सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार यांसह अनेक सन्मान त्यांना लाभले.

कवी सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून गुणवत्ताधारक जुन्या-नव्या कवींना व्यासपीठ मिळावे, या हेतूने ही स्पर्धा घेतली जात आहे. कवितेला विषयाचे कोणतेही बंधन नाही. कोणताही कवी कोणत्याही आशयावरील दीर्घ कविता पाठवू शकतो. मात्र एका स्पर्धकाने फक्त एकच कविता पाठवावी. कविता किमान 20 पानांपेक्षा अधिक असावी. कविता पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविणे बंधनकारक आहे. मान्यवर कवी व समीक्षक स्पर्धेचे परीक्षण करतील व त्यात संस्थेचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही. कविता पाठविण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2026 आहे. कविता पाठविण्याचा पत्ता : अजय कांडर, अभंग, कलमठ – गोसावीवाडी, कणकवली, जि. सिंधुदुर्ग – 416602 मो. 9404395155

You cannot copy content of this page