परशुराम उपरकर:अवैध धंदे, पोलीस संरक्षण आणि भ्रष्ट कारभारावर पत्रकार परिषदेत घणाघाती टीका..
⚡कणकवली ता.२८: पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेत असलेल्या राणे कुटुंबाला सिंधुदुर्गातील अधिकारी मानत किंवा ऐकत नसल्याची घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असून त्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत होता. आता स्वतः आमदार निलेश राणे यांनीही अशाच प्रकारचे आरोप केल्याने हा सरकारलाच घरचा अहेर असल्याचे उपरकर म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंपी यांच्यावर कारवाईचा विषय विधिमंडळात गाजला होता. तरीदेखील त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आल्याबद्दल उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कणकवली तहसीलदार भ्रष्ट कारभार करत असून त्यांनाच देवगड तहसीलदार पदी बदली देण्यासाठी पालकमंत्री प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी वार्षिक केवळ एक लाख रुपयांची दिवाबत्ती तरतूद केली जाते, तर अफजलखानाच्या कबरीसाठी अडीच लाख रुपये दिले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत हिंदुत्वाचा दावा करणारे मंत्री नितेश राणे याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही उपरकर यांनी केली.
विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काहीही साध्य होत नसल्याचे सांगत त्यांनी ओसरगाव टोलनाका प्रश्नावरही भाष्य केले. टोलवसुलीला जनतेतून आणि विरोधी पक्षातून तीव्र विरोध झाला होता. मागील टोलवसुली ठेकेदार कंपनीत मंत्री नितेश राणे भागीदार होते, असा गंभीर आरोपही उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
