नगरसेवक रविकिरण तोरसकर यांची आम. प्रमोद जठार यांच्याकडे मागणी..
⚡मालवण ता.२५-:
मालवण मधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिमाखदार पुतळ्याजवळ कोईंबतूर येथील ‘आदियोगी शिवा’च्या धर्तीवर भव्य साउंड आणि लेझर शो सुरू करण्यात यावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आमदार जठार यांनी तातडीने पावले उचलत, इतिहास अभ्यासिका डॉ. ज्योती तोरसकर यांना या लेझर शोची संहिता लिहिण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या मालवण आणि परिसरातील सिंधुदुर्ग, राजकोट, पदमगड, सर्जेकोट या ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक येत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. देशात इतर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे लेझर आणि साउंड शो पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून गर्दी करतात. त्याच धर्तीवर राजकोट येथेही असा शो सुरू झाल्यास मालवणच्या पर्यटनात एक मानाचा तुरा रोवला जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास आणि या पुरातन वास्तूंचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. राजकोट येथे लेझर आणि साउंड शो सुरू झाल्यास शिवप्रेमींना आणि पर्यटकांना इतिहासाचे एक वेगळे दालन अनुभवायला मिळेल. तसेच महाराजांच्या गडदुर्गाचा इतिहासही प्रभावीपणे मांडता येईल. असे मत श्री. तोरसकर यांनी व्यक्त केले आहे.
आमदार प्रमोद जठार हे नेहमीच गड-किल्ले संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या बाबतीत संवेदनशील राहिले आहेत. यापूर्वीही त्यांच्या माध्यमातून विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांबाबत विविध रचनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. या नव्या संकल्पनेलाही त्यांनी तातडीने होकार दिला असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून मालवणच्या पर्यटन वैभवात मोठी भर पडणार आहे, असा विश्वास श्री. तोरसकर यांनी व्यक्त केला आहे.
