वीज ग्राहकांच्या त्रासाचा उद्रेक:वीज ग्राहक संघटनेची अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक,वीज पुरवठा सुरळीत ठेवू अशी अधीक्षक अभियंता यांची ग्वाही..
⚡कुडाळ ता.२५-: महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आज वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली. जिल्हाभरातून आलेल्या वीज ग्राहकनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जात विविध प्रश्नांवर अधीक्षक अभियंता यांना जाब विचारला. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या आंब्रड येथील लिंक लाईन आणि तर वीज समस्या ३० मे पर्यंत सोडविल्या गेल्या नाही तर आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघात एकही वीज कर्मचाऱ्याला फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविले जातात यावर देखील वीजग्राहक आक्रमक झाले होते. पावसाळा तोंडावर आला तरी महावितरणची बरीचशी काम झाली नसल्याचा आरोप यावेळी वीज ग्राहकांनी केला. दरम्यान महावितरण कडून वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या असून पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने राहण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली.
आपल्या अनेक समस्या घेऊन आज जिल्हाभरातील वीज ग्राहक महावितरणच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर धडकले. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे आणि जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांनी आपले विविध प्रश्न अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याकडे मांडले. तसेच त्याबाबतचे निवदेन अधीक्षक अभियंता याना दिले.
या निवेदनामध्ये म्हटले आहे, वीज ग्राहक, व्यापारी, कारखानदार, लघुउद्योग यांना अनेक वीज समस्या निर्माण होऊ नये यासाठी जीर्ण झालेले खांब तात्काळ बदलण्यात यावेत व झाडी मारणे. जेणेकरुन कोणतीही जिवीतहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याच बरोबर 33Kv , 11 KV, LT, NT Line तात्काळ झाडी मारणे व आवश्यक त्या ठिकाणी गार्डोंग करण्यात यावी. जेणेकरुन वायर तुटून कोणतीही जिवीतहानी होऊ नये याकडे लक्ष देणे. त्याच बरोबर कमी जास्त व्होल्टेज होत असल्यामुळे घरगुती व व्यावसायिक किमतीच्या वस्तू खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक अशा ठिकाणी जास्त व्होल्टेजचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत. तसेच आपले कार्यालया मार्फत जिल्ह्यातील मान्सून पूर्व कामे झालेली नाहीत असे दिसून येते. त्यामुळे आपले मार्फत वीज ग्राहकांना नजरचुकीने वीज बिले जास्त आकारण्यात आली असतील तरती तपासून त्वरीत कमी करुन देण्यात यावी. जेणेकरुन वीज ग्राहकांवर अन्याय होऊ नये.
तसेच वीज कायदा 2003 अधिनियम क्र. 47 (5) यामध्ये ग्राहकाने कोणता मीटर वापरणे निवड करणेचे कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत. याचे अवलोकन करावे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या लेखी सहमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत. तसेच नवीन स्मार्ट, इलेक्ट्रीकल्स मीटर बसविण्यात येवू नयेत. कारण स्मार्ट मीटर बाबत आपल्या कार्यालयाकडे स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन उपोषणे झालेली आहेत व प्रिपेड स्मार्ट /इलेक्ट्रॉनिक्स मीटर विरोधी अर्ज वीज ग्राहकांनी आपल्या संबंधित कार्यालयाकडे लेखी अर्ज दिलेले असून सुध्दा आपल्या कार्यालयामार्फत स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधी हजारो वीज ग्राहक अर्ज आपल्या विभागाकडे आलेले आहेत हे नाकारता येत नाही. प्रिपेड /इलेक्ट्रॉनिक्स टी.ओ.डी. मीटर जबरदस्तीने बसविले जात आहे ते थांबवावेत. तसेच. याचे पूर्वी संघटनेच्या वतीने वारंवार पत्र व्यवहार आपल्या कार्यालयाकडे केलेले आहेत याचे अवलोकन करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंब्रडच्या समस्या ३० मे पर्यंत सोडावा – आबा मुंज
आंब्रड जि प मतदारसंघातील समस्यांबाबत माजी जि प सदस्य आबा मुंज यांनी लक्ष वेधले. कमी दाबाचा वीज पुरवठा, तसेच वारंवार तक्रार करून सुद्धा ओरोस व पणदुर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यामुळे शाळेतील मुलांचे शैक्षणिक शेतकऱ्याचे नुकसान बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे, असे प्रश्न मांडण्यात आले. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या समस्या जर येत्या ३० मे पर्यंत सुटल्या नाहीत तर महावितरणच्या एकही अधिकारी-कर्मचाऱ्याला मतदार संघात फिरू देणार नाही, आले तर त्यांना बांधून ठेऊ, असा इशारा आबा मुंज यांनी दिला. यावेळी आबा मुंज आक्रमक झाले होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदान कवठणकर, संजय गावडे आणि रुपेश पावसकर, कुडाळचे अध्यक्ष गोविंद सावंत यांनी आपापल्या भागातील वीज समस्या मांडल्या. नंदन वेंगुर्लेकर यांनी कोणाची परवानगी न घेता मीटर बदलले जातात याकडे लक्ष वेधले. त्याबाबत काही गाईड लाईन्स असल्यास सांगा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान महावितरण कडून वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या असून पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने राहण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली. आंब्रड गावच्या लिंक लाईनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ तीन वीज खांब टाकायचे आहेत. पण त्याला स्थानिक ग्राहक अडथळा करत आहेत. त्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन येत्या ३० ते ३१ मे पर्यंत ते काम पूर्ण करू अशी ग्वाही श्री. राख ह्यांनी दिली.
यावेळी जि. प. सदस्य रुपेश पावसकर, संजय गावडे, आणि सुदन कवठणकर, पं. स. सदस्य कृष्णा धुरी, विज ग्राहक सघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, संघटना समन्वयक ऍड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा व्यापारी संघटना उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मेघनाथ धुरी, वीज ग्राहक संघटना सचिव तुकाराम म्हापसेकर, दोडामार्ग संघटना सचिव भूषण सावंत, आंब्रड सरपंच मानसी कदम, माजी जि. प. सदस्य आबा मुंज, स्वप्नील मुंज, पाडूरंग दळवी, कुडाळ अध्यक्ष गोविंद सावंत, महेंद्र कदम, महावितरण अधिकारी श्री. वनमोरे, वीज ग्राहक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महावितरण कडून यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
