मारहाणीच्या निषेधार्थ अर्धा तास महामार्ग रोखला; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत..
⚡सावंतवाडी ता.२५-: गोवा मांद्रे येथे काल रात्री तळवडे येथील नागरिकांनी मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा बॉर्डरवर चक्काजाम करण्यात आले. युवा सैनिकांनी दोन्ही बाजूंचा महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला. अखेर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्हीबाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आज दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गच्या सीमेवर महाराष्ट्र व गोवा राज्यातील वाहतूक रोखून धरण्यात आली. युवा सेनेचे, माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सुरज परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझ्यासह आमच्या कुटुंबातील व्यक्तींना गोव्यात ४० हून अधिक जणांनी दारूच्या नशेत मारहाण करण्यात आली. लहान मुलांसह महिलांवरही हल्ला करण्यात आला. गोवा पोलिसांना याबाबत माहिती देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचही लक्ष वेधले होते. मात्र, त्यांच्याकडूनही दखल न घेतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखली अशी माहिती श्री. परब यांनी दिली. यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली. यावेळी बांदा येथील काही नागरिकांकडून रूग्णवाहिकेला होणारा अडथळा बघता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी बांदा पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. पोलिस प्रदीप नाईक यांसह बांदा पोलिसांनी हस्तक्षेप करत महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करून दिला.
दरम्यान, संबंधितांची बाजू आम्ही ऐकून घेतली असून त्यांच्याकडून अर्ज घेतला जाईल व पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती बांदा पोलिस निरीक्षक श्री. शिंदे यांनी दिली. जवळपास अर्धा तास वाहतूक बंद ठेवल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याप्रकरणी गोवा अन् महाराष्ट्राचे मंत्री कोणती भूमिका घेतात व निर्माण झालेला हा तणाव कसा निवळतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
