प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी;जिल्हधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा
*💫मालवण दि.२७-:* आचरा डोंगरेवाडी पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार करून महिना होउन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही. तसेच प्रशासनाकडून पहाणी केली त्यांचा कोणताही अहवाल ग्रामस्थांना मिळाला नाही त्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.तरी या प्रकल्पावर तातडीने कारवाई न झाल्यास प्रशासनाचे निर्बंध झुगारुन ग्रामस्थ येत्या चार पाच दिवसात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. या निवेदनात हा प्रकल्प डोंगरेवाडी पारवाडी येथील ग्रामस्थांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत असून तौत्के वादळामुळे या दोन्ही वाडीतील शेतजमिनीत उधाणाचे खारे पाणी शिरून जमीन नापिक झाली आहे.या प्रकल्पाला घातलेल्या बंधाऱ्यामुळे पाणी साचून विहिरींचे पाणी दुषीत झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पावसाळ्यात या प्रकल्पामुळे गंभीर समस्या निर्माण होवू शकतात.एवढी गंभीर समस्या असताना प्रकल्प बंद करण्यासाठीग्रामस्थांनी केलेल्या मागणीकडे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने ग्रामस्थांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला असून कुणा एका व्यक्ती साठी संपूर्ण प्रशासन जीव घेणार आहे काय असा प्रश्न विचारत निवेदनातून ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
