संदीप गावडे,:गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार..
⚡सावंतवाडी ता.३०-: “अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या यशवंतच्या स्मृती जपण्यासाठी आणि ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला. कोकण बोर्डाचा निकाल नेहमीच उत्तम लागतो, मात्र स्पर्धा परीक्षेत आमची मुले मागे पडू नयेत, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.” असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी आज येथे काढला.सावंतवाडी येथे संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२४-२५’ चा भव्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
यावेळी बोलताना निरवडेकर म्हणाले,एखाद्या सुशिक्षित व्यक्तीने राजकारणात प्रवेश केल्यावर काय सकारात्मक बदल घडू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संदीप गावडे. ज्याला शिक्षणाबद्दल आदर आहे, तोच असे विधायक उपक्रम राबवू शकतो. ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली महत्त्वाची गुंतवणूक आहे,” असे गौरवपूर्ण उद्गार सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी काढले.
यावेळी व्यासपीठावर आयोजक संदीप गावडे, एकनाथ गावडे, सुनिता गावडे, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, जि.प सदस्य शोभाताई गावडे, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, गटशिक्षणाधिकारी शिंदे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म. ल. देसाई, सागर ढोके, अनिकेत आसोलकर, गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमेरिकेमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पावलेले यशवंत गावडे यांच्या स्मरणार्थ या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यशवंत हे दशक्रोशीतील पहिले आयटी इंजिनिअर होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना संपूर्ण सभागृहाने दोन मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपनगराध्यक्ष निरवडेकर यांनी संदीप गावडे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, फुटबॉल स्पर्धा, भव्य दहीहंडी आणि आता शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विशेषतः गेळे गावातील ‘काबूलदार गावकर’ जमिनीचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संदीप गावडे आणि सागर ढोके यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
करिअर मार्गदर्शनाची मागणी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी आपल्या भाषणात १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबिरे सुरू करण्याची मागणी केली, ज्याला संदीप गावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गुणवंतांचा सन्मान या सोहळ्यात परीक्षेतील पहिल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले.
