रक्तदान शिबिराला बांद्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

४० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग..

⚡बांदा ता.२७-: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजात मानवतेची भावना जपणारे असे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले. श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री दत्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड उष्मा असूनही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन तोरसे (पेडणे) गावच्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रार्थना मोटे, उद्योजक प्रभाकर मोटे, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, तोरसेचे जिल्हा परिषद सदस्य रमेश सावळ, दत्तप्रसाद कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत पांगम, उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, बांबोळी रक्तपेढीचे डॉ. पास्कल तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संपन्न झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो, असे सांगितले. तरुणांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा, महिलांनीही निर्भयपणे सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश केसरकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर, अक्षय मयेकर, राजेश विरनोडकर, दर्पण आळवे, शुभम साळगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांची नोंदणी, मार्गदर्शन, व्यवस्था आणि नियोजन यासाठी स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले, तर आभार रामचंद्र उर्फ भाऊ वाळके यांनी मानले. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी देखील उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
फोटो:-
बांदा येथे आयोजित रक्तदान शिबिराचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना मान्यवर.

You cannot copy content of this page