शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी मार्गे फोंडाघाटला उतरवावी…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

सिंधुदुर्ग : नवीन रिवाईज शक्तिपीठ महामार्गाची अंतिम अलाइनमेंट राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट परिसरात उतरवून जिल्ह्याच्या पर्यटन व आर्थिक विकासाला चालना द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी परिसराच्या जवळून प्रस्तावित महामार्ग जात असल्याने हा मार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणणे व्यवहार्य ठरेल. राधानगरी ते सिंधुदुर्ग अंतर अवघे ३० ते ४० किलोमीटर असल्याने या मार्गामुळे जिल्ह्याला मोठा फायदा होईल. महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (मुंबई-गोवा महामार्ग) शी थेट जोडणी द्यावी किंवा सह्याद्री पायथ्याशी ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार समांतर मार्ग विकसित करून तो कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यातून बांदा-पात्रादेवीपर्यंत नेण्यात यावा. या निर्णयामुळे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यातील गावांचा सर्वांगीण विकास होऊन आर्थिक दळणवळण वाढेल, स्थानिक उद्योगांना चालना मिळेल तसेच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

महामार्गाची आखणी करताना कणकवली, ओरोस, कुडाळ व सावंतवाडी या प्रमुख शहरांना थेट जोडणी देणे आवश्यक असून, त्यामुळे कोल्हापूरकडे जाण्याचा सध्याचा ३ ते ३.५ तासांचा प्रवास वेळ कमी होऊन १ ते १.५ तासांपर्यंत येऊ शकतो. तसेच प्रस्तावित संकेश्वर – रेड्डी चौपदरीकरण मार्ग तसेच घोटगे – पाटगाव महामार्गाशी जोडणी देण्यात यावी. यामुळे बेळगाव, निपाणी, आजरा, गारगोटी, गडहिंग्लज आदी भागांशी संपर्क सुलभ होईल.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून, राधानगरी मार्गे महामार्ग झाल्यास सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, देवगड – मालवण – वेंगुर्ला किनारपट्टी, दाजीपूर अभयारण्य, आंबोली, सावडाव धबधबा, सावंतवाडी मोती तलाव, राजवाडा, रांगणागड आदी पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव दत्त मंदिर, वालावल लक्ष्मीनारायण मंदिर, धामापूर भगवती मंदिर, आरवली वेतोबा मंदिर आदी धार्मिक स्थळांनाही थेट लाभ होऊन धार्मिक पर्यटन वाढेल, असे संदेश पारकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page