स्वच्छतेचा फज्जा, गाड्यांची कमतरता, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय उर्फ बाळ चिंदरकर संतप्त..
⚡देवगड ता.२४-:
महाराष्ट्रात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध चांगले उपक्रम राबवले जात असून कोट्यावधीच्या निधीमधून देवगड एसटी आगाराचे सुशोभीकरणही सुरू असल्याचे सांगत या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.कोकणातील सर्वसामान्यांसाठी एसटी हे महत्त्वाचे वाहतूक साधन असल्याने आधुनिक व सुसज्ज डेपो उभारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मात्र, सध्या सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात दिरंगाई होत असल्याची खंत व्यक्त करत स्वच्छता मोहिमेचा देखील बोजवारा उडालेला पहायला मिळतोय असे मत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख विजय उर्फ बाळ चिंदरकर यांनी व्यक्त केले.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख विजय उर्फ बाळ चिंदरकर यांनी आज देवगड, कणकवली व सावंतवाडी विभागाच्या दौऱ्यात देवगड एसटी डेपोची सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल,देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके,देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू आदी उपस्थित होते.
चिंदरकर पुढे म्हणाले की,देवगड एसटी डेपोच्या सुरू असलेल्या इमारत बांधकामाबाबत उपसभापतींकडून मिळालेल्या माहितीनुसार डेपोतील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.देवगड येथील एसटी डेपो परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. डेपो परिसरात स्वच्छतेचा अभाव असून प्रवाशांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची बाब उघडपणे मांडण्यात आली. विशेषतः स्वच्छतागृहामधील महिला व पुरुष या दोन्ही कक्षात अस्वच्छता, दुर्गंधी, तसेच नळांचे कॉक तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबींवर एसटी प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असल्याने संबंधित स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. तसेच नूतनीकरण कामाचे ठेकेदारांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सोमवारपर्यंत सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन यावेळी ठेकेदाराने दिले.
दरम्यान, सध्या डेपोत ४५ गाड्या कार्यरत असून त्यापैकी तीन गाड्या नादुरुस्त आहेत. एकूण ५५ गाड्यांची गरज असताना किमान दहा अतिरिक्त गाड्यांची आवश्यकता असल्याचे स्थानक प्रमुख सैतावडेकर यांनी सांगितले.मे महिन्यात चाकरमान्यांची व प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी लवकरच आवश्यक गाड्या उपलब्ध करून देऊन समस्या मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन यावेळी विजय उर्फ बाळ चिंदरकर यांनी दिले. तसेच या सर्व समस्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
