जिल्ह्यातील ४५० हून अधिक खेळाडूंनी केली गुणवत्ता सिद्ध..
⚡वेंगुर्ला ता.२०’: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आयोजित केलेली ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली नगरपरिषदांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या १५० व्या वर्षात म्हणजेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. येत्या २५ मे २०२६ रोजी हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत असून, वर्षानुवर्षे शहराच्या विकासासोबतच ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत नगरपरिषदेने सातत्याने प्रगतीची वाटचाल केली आहे.
या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी वेंगुर्ला येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगण (कॅम्प) येथे ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन शनिवार १८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलनाने संपन्न झाला. याप्रसंगी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तहसिलदार ओंकार ओतारी,
वेंगुर्ला मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, कसई दोडामार्ग नगराध्यक्ष श चेतन चव्हाण, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरावडेकर, बॅ. खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, तसेच कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, कसई दोडामार्ग मुख्याधिकारी संकेत गायकवाड आणि वाभवे-वैभववाडी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्यासह वेंगुर्ला नगरपरिषदेचे विषय समिती सभापती व नगरसेवक त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नगरसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध नगरसंस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ४५० हून अधिक खेळाडूंनी क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, गोळाफेक, धावणे, महिलांसाठी विशेष रस्सीखेच आणि पुरुषांसाठी पोहण्याच्या स्पर्धांमध्ये आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धेच्या निकालांमध्ये पुरुष क्रिकेट मध्ये सावंतवाडी नगरपरिषद संघ विजेता तर वाभवे वैभववाडी नगरपंचायत उपविजेता ठरला. महिला क्रिकेटमध्ये कुडाळ नगरपंचायत संघ विजेता व वेंगुर्ला नगरपरिषद संघ उपविजेता ठरला. पुरुषांच्या बॅडमिंटन डबल्समध्ये वेंगुर्लाचे नगराध्यक्ष दिलीप गिरप व नगरसेवक विनय नेरुरकर यांनी विजेतेपद पटकाविले, तर कणकवली नगरपंचायतीचे संकेत नाईक व सुमित कुबल उपविजेते ठरले. महिला बॅडमिंटन एकेरीत कणकवलीच्या जयश्री ठाकरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर वेंगुर्लाच्या पूर्वा मसुरकर उपविजेत्या ठरल्या. पुरुष बुद्धिबळ स्पर्धेत कसई दोडामार्ग मुख्याधिकारी श्री. संकेत गायकवाड हे विजेते ठरले, तर कणकवलीचे अमोल आघमे हे उपविजेते ठरले. महिला बुद्धिबळ स्पर्धेत वेंगुर्लाच्या पूर्वा मसुरकर यांनी विजेतेपद पटकावले, तर कणकवलीच्या जयश्री ठाकरे उपविजेत्या ठरल्या. महिलांच्या चुरशीच्या ठरलेल्या रस्सीखेच स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषद संघाने प्रथम क्रमांक पटकावला. आहे तर कुडाळ नगरपंचायत संघ उपविजेता ठरला. गोळाफेक स्पर्धेत महिला गटामध्ये वैष्णवी पेडणेकर (कुडाळ) यांनी प्रथम, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर (कुडाळ) यांनी द्वितीय आणि नगरसेविका गौरी मराठे (वेंगुर्ला) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच पुरुष गटातील गोळाफेक स्पर्धेत दत्तप्रसाद नांदोसकर (वेंगुर्ला) यांनी प्रथम, शुभम लाखे (सावंतवाडी) यांनी द्वितीय, तर हेमंत चव्हाण (वेंगुर्ला) यांनी तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले. १०० मी. धावणे महिला गटामध्ये वैष्णवी पेडणेकर (कुडाळ) यांनी प्रथम, नगरसेविका समिधा रेडकर (वेंगुर्ला) यांनी द्वितीय, प्रणाली कोटेकर (वेंगुर्ला ) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच १०० मी. धावणे पुरुष गटामध्ये सुजल मुणगेकर (कणकवली) यांनी प्रथम, वामन पालकर (दोडामार्ग) यांनी द्वितीय आणि रघुनाथ जाधव (वेंगुर्ला) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. कॅरम स्पर्धेत पुरुष गटात युवराज मेहत्तर (सावंतवाडी) विजेता ठरला. तर निवेद कांबळे (दोडामार्ग)उपविजेता. तसेच महिला कॅरममध्ये वेंगुर्लाच्या नगरसेविका लीना म्हापणकर विजेत्या ठरल्या आणि विणा वेंगुर्लेकर उपविजेत्या ठरल्या. पुरुषांसाठी आयोजित केलेल्या पोहण्याच्या (स्विमिंग) स्पर्धेत ध्रुव गवंडळकर (वेंगुर्ला) यांनी प्रथम, राहुल कांबळे (वेंगुर्ला) यांनी द्वितीय आणि भूषण कामतेकर (मालवण) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले की, “नगरपरिषदेच्या १५० व्या वर्षाचे औचित्य साधून अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींमधील उत्साह वाढविणे, त्यांच्या आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे व आपआपसांत सामुदायिक एकता आणि संघटन भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आगामी महिन्यात अशाच प्रकारचे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवून वेंगुर्ला नगरपरिषदेचा हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.
