गावातील रस्ते प्लास्टिकमुक्त; दोन तास राबवली मोहीम..
कणकवली : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली. या उपक्रमातून गावातील काही रस्ते प्लास्टिकमुक्त करण्यात आले. मोहिमेत स्वच्छता प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आरोग्यासाठी अनेक नागरिक मॉर्निंग वॉक करतात. त्याच वेळी आपण ज्या रस्त्यावर चालतो, तो रस्ताही स्वच्छ ठेवता येऊ शकतो, या संकल्पनेतून पत्रकार गणेश जेठे यांनी हा उपक्रम सुरू केला. गेली पाच-सहा वर्षे ते दररोज सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान कोंडये गावातील रस्त्यांच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा उचलत आहेत. त्यामुळे गावातील काही रस्ते नेहमीच स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त राहतात.
रविवारी आयोजित विशेष मोहिमेला कोंडये आणि करंजे गावांच्या हद्दीवर प्रारंभ करण्यात आला. यावेळी पत्रकार गणेश जेठे यांनी मोहिमेची संकल्पना आणि उद्दिष्ट स्पष्ट केले. स्वच्छता प्रेमी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहिमेचे महत्त्व सांगितले. हरकुळखुर्दचे माजी उपसरपंच संजय रावळे यांनीही आपल्या गावात अशी मोहीम राबविणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक आणि कोंडये गावचे सुपुत्र विद्याधर तांबे यांनीही मोहिमेत सहभागी होत, या उपक्रमामुळे आरोग्य आणि स्वच्छता ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होत असल्याचे नमूद केले.
या मोहिमेत पंचायत समिती सदस्य महेंद्र डीचवलकर, पत्रकार सचिन राणे, विनायक पाताडे, पत्रकार तुषार नेवरेकर, प्रा. शेख, विजय जामदार, अशोक पेडणेकर, अभिजीत लोके, माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, अनिल मेस्त्री, प्रदीप फोपे, रोहित मोंडकर, दर्वेश परब, सिद्धेश मोंडकर, राजन धोपटे, अनिकेत जेठे, निलेश मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री, प्रवीण मेस्त्री, अनुज जेठे, प्रकाश तेली, अमित आंबेरकर, पुंडलिक लाड, तृप्ती लाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मुंबईस्थित चाकरमानी मधुकर जोईल यांनी या उपक्रमासाठी टी-शर्ट पुरविले, तर चहा-पाण्याची व्यवस्था विद्याधर तांबे यांनी केली.
बॉक्स
मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी ठरणार – गणेश जेठे
यावेळी गणेश जेठे म्हणाले, स्वच्छता मिशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र त्याची सुरुवात आपल्या गावापासून व्हायला हवी. गेली अनेक वर्षे आम्ही मॉर्निंग वॉकदरम्यान रस्त्यांवरील प्लास्टिक कचरा उचलत आहोत. रविवारी झालेल्या मोहिमेत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, याचा विशेष आनंद आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने कोंडये गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
