मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी जिंकली रसिकमने:भूषण साटम यांनी साकारली कवी भूषण..
⚡कुडाळ ता.१९-: मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘शिवराज भूषण’ या नाटकाने कुडाळकर रसिकांवर अक्षरशः गारुड केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यावर कवी भूषण यांनी ब्रज भाषेत लिहिलेल्या ‘शिवभूषण’ ग्रंथद्वारे ३८० छंदातून भाष्य केले. त्यापैकी निवडक २१ छंद या नाटकात आहेत. ब्रज भाषेतील वीररसपूर्ण हे छंद लीलया आपल्या वाचिक आणि कायिक अभिनयातून सादर करत कवी भूषण यांची भूमिका साकारणाऱ्या भूषण साटम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले. एक नितांत सुंदर आणि वीररस पूर्ण प्रयोग पाहिल्याचे समाधान हाऊसफुल्ल गर्दी करणाऱ्या रसिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका, जाज्वल्य आणि वैभवशाली पराक्रम हिंदुस्थानभर पोहोचविण्याचे काम केले ते कवी भूषण यांनी. यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी ‘शिवराज भूषण’ हे महानाट्य रंगमंचावर आणले आहे. या महानाट्याचा सातवा प्रयोग शनिवारी सायंकाळी कुडाळच्या बाबा वर्दम स्मृती रंगमंचावर रसिकांच्या हाऊसफुल गर्दीत सादर झाला. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पत्रकार शेखर सामंत, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, नाटकाचे लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, नगरसेविका संध्या तेरसे, गजानन कांदळगावकर, साईनाथ जळवी, अमरसिंह जाधव, निर्माते भूषण साटम, भाऊ सामंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रमोद जठार आणि शेखर सामंत यांनी या महानाट्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद जठार यांच्या हस्ते भूषण साटम याना गौरविण्यात आले.
नांदीने नाटकाला सुरुवात झाली. निवेदकाने कथानक सांगायला सुरुवात केली आणि अगदी पहिल्या क्षणापासून नाटकाने रसिक मनाची पकड घ्यायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्वारूढ होत रंगमंचावर प्रवेश केला आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नंतर या टाळ्या अखंड वाजतच होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका, जाज्वल्य आणि वैभवशाली पराक्रम हिंदुस्थानभर पोचविण्याचे काम ज्या कवी भूषण यांनी केले, ती भूमिका साकारली होती भूषण साटम यांनी. संपूर्ण महानाट्य जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम दाखविते तसेच ते कवी भूषण यांनी त्या पराक्रमाचे केलेले वर्णन आपल्या छंदांनी अधोरेखित करते. शिवभूषण ग्रंथामध्ये असलेल्या ३८० छंदांपैकी २१ छंद कवी भूषण सादर करतात. ब्रज भाषेतील ते छंद आणि काही वेळा त्याचा मराठीत अर्थ सांगणे हि फार कठीण गोष्ट भूषण साटम यांनी लीलया पेलली. त्यांची शब्दफेक, देहबोली, रंगमंचावरील वावर यांनी प्रत्येक रसिकाच्या मनात वीररस जागृत केला.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय सुंदररित्या साकारली ती कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुलीचे गुणी कलाकार किशोर सरनोबत यांनी. कथानक पुढे नेणारे निवेदक संजय शिंदे यांनी रसिकांना त्यांच्या वाणीने खिळवून ठेवले. बाकी इतर कलाकार सुद्धा आपापल्या भूमिकांमध्ये अगदी चपखल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफझलखान हत्या, पावनखिंड लढाई, शाहिस्तेखानावर हल्ला आणि शेवटी शिवराज्याभिषेक सोहळा या गोष्टी या महानाटकात दिसतात. तरी देखील प्रयोग कुडाळला असल्याने कुडाळच्या खवास खानाविरुद्धच्या शिवरायांच्या लढाईचा प्रसंग रसिकांची मोठी दाद मिळवून गेला.
शिवराज्यभिषेक सोहळा तर या महानाट्याला अत्तुच्य उंचीवर घेऊन जातो. आपण खरोखर रायगडावर हा सोहळा अनुभवतो आहोत कि काय असे रसिकांना भासविण्यात ‘शिवराज भूषण’ची टीम यशस्वी ठरली. छत्रपती शिवाजी महाराज, कवी भूषण यांची प्रेक्षकांतून एंट्री लाजवाब होती. एका बाजूला राज्याभिषेक होत असताना मालवणच्या स्वराज ढोल पथकाने केलेली ढोलगर्जना एका वेगळ्याच वातावरणात नेणारी ठरली. सर्वच रसिकांनी एक नितांतसुंदर प्रयोग पाहिल्याची भावना व्यक्त केली.
मालवण आणि कुडाळ मधील तब्बल ८२ कलाकार या महानाट्यामध्ये काम करत आहेत. यामध्ये चाट जीपीटी, एआय, भव्य एलईडी स्क्रीन यांचा वापर केलेला आहे. लढाया, नृत्य या महानाट्यामध्ये पाहायला मिळतात. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कवी भूषण यांनी म्हटलेल्या छंदावर कैलास लेण्यातील शंकर पार्वती नृत्य करतात ते असो कि रायगड किल्ला असो रसिकांना इतिहास जिवंत अनुभवता आला.
कवी भूषण यांच्या ‘शिवभूषण’ ग्रंथावर आधारित हे भारतातील पहिलेच महानाट्य असल्याचा दावा भूषण साटम यांनी केला आहे. आता पर्यंत या महानाट्याचे मालवण, रत्नागिरी, वेंगुर्ला असे सहा प्रयोग झाले आहेत. कुडाळचा सातवा प्रयोग होता. हा प्रयोग एवढा रंगला कि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्याचे कवी भूषण यांनी केलेले सार्थ वर्णन मनात साठवून ठेवतच रसिकांनी नाट्यगृह सोडले.
