महिला आरक्षणावर काँग्रेसचा ‘डबल गेम’,साक्षी वंजारींनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी…

श्वेता कोरगावकर:डिलिमिटेशन’ मतदारसंघ पुनर्रचना या संकल्पनेचा वंजारी यांनी अभ्यास केला आहे का..?

⚡सावंतवाडी, ता.१९-:
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका ही हतबल आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केला आहे. तसेच या विषयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांनी अभ्यासपूर्ण वक्तव्य करावे, असा टोला त्यांनी लगावला.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्या म्हणाल्या, भारतासारख्या विशाल देशात खासदारांना मोठ्या मतदारसंघांमध्ये सर्व प्रश्नांपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने देशातील सुमारे ५० टक्के असलेल्या महिला वर्गाला लोकसभेत आरक्षण देणे अत्यावश्यक आहे. महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यास देशाच्या प्रगतीला चालना मिळेल, असे कोरगावकर यांनी नमूद केले. ज्या कुटुंबात महिलांचे मत विचारात घेतले जाते ते कुटुंब प्रगती करते, त्याच धर्तीवर देशातही सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
भाजप व सहयोगी पक्षांनी महिला सक्षमीकरणासाठी भूमिका घेतली असताना, काँग्रेसने मात्र महिलांचा हक्क डावलल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक दशकांपासून महिला आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसने संसदेत आपले खरे स्वरूप उघड केले असून, ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकावर घेतलेली भूमिका ही महिलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस सध्या ‘राजकीय डबल गेम’ खेळत असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका करताना कोरगावकर यांनी साक्षी वंजारी यांनी ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) या संकल्पनेचा अभ्यास केला आहे का, असा सवाल उपस्थित केला.
२०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकातील अटींनुसार नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतरच आरक्षण लागू होणार होते. त्यामुळे महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी १० ते १२ वर्षांचा कालावधी लागू शकला असता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षणाचा लाभ तातडीने मिळावा, अशी भूमिका मांडली होती. ही भूमिका महिलांच्या हिताची असताना काँग्रेसने त्यास विरोध केल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुजाण महिला मतदानातून योग्य उत्तर देतील, असा विश्वास कोरगावकर यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page