अधिकाऱ्यांसोबत बैठका कोण घेत होते? याचेही आत्मपरीक्षण करावे – बाबी जोगी..
⚡मालवण ता.१८-:
भ्रष्टाचार विरहित काम करण्याची भूमिका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली होती. परंतु काही कालावधीतच बालोद्यान मध्ये खेळाचे साहित्य बसविण्याच्या टेंडरच्या बिलात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे स्टिंग ऑपरेशन बाहेर आहे. त्याबाबत महेश कांदळगावकर यांच्या मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप देखील उपलब्ध आहेत. त्या ऑडिओ क्लिप कशा काय बनल्या? त्याचबरोबर भूयारी गटार योजनेचे काम रखडल्याने इतर नगरसेवकांकडून तसेच जनतेतून संबंधित ठेकेदार बदलण्याची मागणी होत असताना तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेण्यास महेश कांदळगावकर यांना सांगितले होते. परंतु महेश कांदळगावकर यांचे या कामातही ठेकेदारासोबत आर्थिक हितसंबंध असल्याने कांदळगावकर यांनी तोच ठेकेदार कायम ठेवला त्यामुळे आजही भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. त्याला सर्वस्वी महेश कांदळगावकर जबाबदार आहेत. त्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच मालवण शहराचा विकास रखडला, अनेक कामे रखडली हे जनता विसरलेली नाही. म्हणूनच महेश कांदळगावकर यांना त्यांच्या पक्षाकडून मालवण नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे महेश कांदळगावकर यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याअगोदर आत्मपरीक्षण करावे अन्यथा महेश कांदळगावकर यांच्या भ्रष्टाचाराच्या ऑडिओ क्लिप चौकाचौकात लावल्या जातील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिला आहे.
बाबी जोगी यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, , मालवण शहरवासीयांना महेश कांदळगावकर हे स्वच्छ प्रतिमेचे वाटल्याने मालवण शहरातील काही अराजकीय नागरिकांनी महेश कांदळगावकर यांना नगराध्यक्ष करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शहरवासीयांची भावना लक्षात घेऊन वैभव नाईक यांनी त्यावेळी महेश कांदळगावकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी तत्कालीन भाजप पदाधिकाऱ्यांनीही मदत केल्यामुळे महेश कांदळगावकर निवडून आले. त्यानंतर काही कालावधीतच महेश कांदळगावकर यांचे भ्रष्टाचार उघड झाल्याने ज्या लोकांनी महेश कांदळगावकर यांची शिफारस केली ते लोक त्यांच्यापासून दूर गेले. त्यावेळी महेश कांदळगावकर यांना नगराध्यक्ष केल्याबद्दल विरोधकांनीही वैभव नाईक यांना आत्मपरीक्षण करण्यास सांगितले होते. महेश कांदळगावकर यांनी आपल्या कार्यकाळात मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष श्री. वराडकर, शिवसेना पक्षाचे नगरसेवक यांच्यासोबत कधीच जुळवून घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या सोबत निवडून आलेले नगरसेवकही त्यांच्यापासून दूर गेले. महेश कांदळगावकर यांनी साडेतीन वर्षापूर्वी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. या साडेतीन वर्षात त्यांनी मालवण शहरात काय काम केले हे एकदा जनतेसमोर त्यांनी जाहीर करावे. वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याअगोदर त्यांनी मंजूर करून आणलेला मालवण येथील मत्स्यालयाचा निधी मे 2025 मध्ये मागे गेला तेव्हा नगरविकास खाते कोणाकडे होते? सरकार कोणाचे होते? आमदार कोण होते? अधिकाऱ्यांसोबत बैठका कोण घेत होते? हे सांगावे. वैभव नाईक यांनी मालवणात केलेल्या कामाच्या जोरावरच महेश कांदळगावकर यांना नगराध्यक्ष होता आले.परंतु त्यांनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला. त्यामुळे आताच्या निवडणुकीत कुठल्याही प्रभागातून निवडणूक लढविण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. किंबहुना निवडणूक लढविण्याची आपली पात्रता राहिली नाही हे महेश कांदळगावकर यांना आधीच समजल्याने त्यांनी मागच्या दाराने मालवण नगरपरिषदेत प्रवेश केला असल्याची टीका बाबी जोगी यांनी केली आहे.
