उपसभापती अमोल लोके:जिल्हास्तरीय बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप परीक्षेचा देवगडमध्ये उत्साहात समारंभ..
⚡देवगड ता.१७-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप ‘बेस’ परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ देवगड येथे उत्साहात पार पडला. यावेळी पंचायत समिती देवगडचे उपसभापती श्री. अमोल लोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “बेस उपक्रम हा स्तुत्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाची गोडी लावणारा आहे,” असे मत व्यक्त केले.
आपल्या भाषणात पुढे बोलताना श्री. लोके म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व लक्षात घेता अशा उपक्रमांची गरज आज अधिक आहे. ‘बेस’ सारख्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते. ग्रामीण भागातील मुलांना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम हा उपक्रम करत आहे. या उपक्रमासाठी भविष्यात कोणतीही गरज भासल्यास आम्ही नेहमीच सहकार्य करू.”
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘बेस’ पुस्तक तयार करण्यात आले होते. या पुस्तकांमध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आला होता. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित करून त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता.
इयत्ता चौथी व सातवीमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ₹१०,०००, ₹७,००० व ₹५,००० अशी रोख बक्षिसे, प्रशस्तीपत्रक, गुणपत्रक व मेडल देऊन गौरविण्यात आले.
परीक्षेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परीक्षार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पुस्तक व परीक्षा फी मधून खर्च वजा जाता उर्वरित संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांच्या बक्षीस व प्रमाणपत्रांवर खर्च करण्यात येते.
या परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचे संकलन व लेखन आयु. सुप्रिया राजेंद्र कांबळे यांनी केले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
या समारंभासाठी देवदत्त कदम जिल्हा परिषद सदस्य , अमोल लोके उपसभापती, पंचायत समिती देवगड, सुदाम जोशी केंद्रप्रमुख, अशोक जाधव गटसमन्वयक, केंद्रप्रमुख, आनंद जाधव, डॉ. सचिन जाधव केंद्रमुख्याध्यापक, सुनिल कदम कुवळेकर, सेवा निवृत्त कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, ॲड. कुलकर्णी मॅडम, श्री. विजय सहदेव मेस्त्री, ॲड. प्रदीप कदम, सुप्रिया राजेंद्र कांबळे, श्री. अमोल केदार, श्री. रघुनाथ बोडेकर, श्री. सुनील कोदले, श्री. येडगे सर, श्री. प्रकाश झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती सुप्रिया कांबळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती राजश्री राजन मोडकर यांनी ‘बेस’ पुस्तकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट केली. श्रीमती कोदले मॅडम यांनी ‘बेस’ परीक्षेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद जाधव यांनी केले.
यावेळी ॲड. प्रदीप कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांवर प्रकाश टाकत आजच्या शिक्षण व्यवस्थेची दिशा कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, जिल्हास्तरीय बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. इयत्ता चौथीमध्ये प्रथम क्रमांक तन्वी तानाजी भोसले (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा साळशी नं.१), द्वितीय क्रमांक शिवम अमोल जाधव (शिवाजी मेमोरियल हायस्कूल कणकवली) आणि तृतीय क्रमांक आरुष हरिश्चंद्र पेंडूरकर (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा सागवे कात्रादेवी) यांनी पटकावला.
इयत्ता सातवीमध्ये प्रथम क्रमांक साना शशिकांत कांबळे (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा आरे देवीचीवाडी), द्वितीय क्रमांक भाग्यश्री साबू लोणार (जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श जोशी विद्यामंदिर जामसंडे नं.१) आणि तृतीय क्रमांक दूर्वा महेंद्र पराडकर (अ.शी.दे. टोपीवाला हायस्कूल मालवण) यांनी मिळवला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सुनील कदम यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच सर्व उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
