⚡मालवण, ता.१४-:
कुंभारमाठ येथे श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भव्य ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आणि विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा १५ एप्रिल रोजी संपन्न होणार असून कुंभार समाज कुंभारमाठ यांच्या वतीने सर्व भाविकांना दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात सकाळी लवकर होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. सकाळी ९ वाजता संत गोरोबाकाका यांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजेचा प्रारंभ होईल. दुपारी १२.३० वाजता महाआरतीनंतर ‘तीर्थप्रसाद’ व महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
सायंकाळच्या सत्रात भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये सायंकाळी ६ वाजता बुवा संदीप लोके (गुरुवर्य श्री विजय परब बुवा) यांचा ‘श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ (ता. देवगड)’ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. पखवाज वादक योगेश सावंत आणि तबला वादक संदेश सुतार हे या भजनाला साथ देणार आहेत.
सोहळ्याची सांगता रात्री ९ वाजता एका भव्य नाट्यप्रयोगाने होईल. ‘अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ’ यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
या धार्मिक उत्सवासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत गोरोबा काकांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
