मळगावचा ‘व्होल्टेज’ प्रश्न कायमचा सुटणार…

११ केव्ही वाहिनीचे काम सुरू..

⚡सावंतवाडी ता.०९-: माजगाव ते मळगाव परिसरातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या ओपन कंडक्टर बदलण्याच्या कामाला अखेर मंगळवार दि. ७ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या कामामुळे मळगाव परिसरातील कमी दाबाच्या विजेचा (व्होल्टेज ड्रॉप) गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
माजगाव येथून मळगावकडे येणारी ही ११ केव्ही वाहिनी ‘ओपन कंडक्टर’ स्वरूपाची असल्याने पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडणे, इन्सुलेटर शॉर्ट होणे यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. तांत्रिक गळतीमुळे मळगावपर्यंत पोहोचताना ११ केव्हीचे रूपांतर केवळ ९ केव्हीमध्ये होत होते. परिणामी घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, निळकंठ बुगडे, नरेश सावंत व विलास मळगावकर यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. पालकमंत्र्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
त्यानंतर दोन किलोमीटर लांबीसाठी नवीन इन्सुलेटेड कंडक्टर मंजूर करण्यात आला. अधीक्षक अभियंत्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारे वीज खंडित होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार असून, मळगाव परिसरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

You cannot copy content of this page