जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न…

⚡सिंधुर्दुर्गनगरी ता.०८-: जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainer) यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक ०६ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२६ या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाले.
आयोजित प्रशिक्षण शिबिरास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २४ फील्ड ट्रेनर्स उपस्थित होते. या तीन दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीमध्‍ये फील्ड ट्रेनर्स यांना जनगणना २०२७ प्रक्रियेतील टप्पा एक नुसार घरगणना व घरयादी तसेच स्वगणना याबाबत माहिती संकलनाची अचूक पद्धत, नवीन डिजिटल प्रणालीचा वापर आणि क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या संभाव्य अडचणी व त्यावरील उपाययोजना यांविषयी सांखिकी अन्वेषक तथा मास्टर ट्रेनर अरुण साळगावकर व तहसीलदार कुडाळ तथा मास्टर ट्रेनर सचिन पाटील यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.
सदर जनगणना हि सत्र २०२६-२७ मध्ये होणार असून हि दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये स्वगणना व घरगणना पूर्ण होणार आहे. या मध्ये दिनांक १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना व दिनांक १६ मे २०२६ ते १४ जुन २०२६ घरगणना होणार आहे. यानंतर फेब्रुवारी २०२७ पासून दुसरा टप्पा कार्यवाही सुरु होणार असून यामध्ये लोकसंख्या गणना होण्याचे नियोजित आहेत.
प्रशिक्षणाच्‍या शेवटच्‍या दिवशी म्‍हणजे दिनांक ०८ एप्रिल २०२६ रोजी सर्व फील्ड ट्रेनर्स यांना प्रत्यक्ष स्थळावर (On-field) नेऊन प्रशिक्षण देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावर माहिती संकलित करताना येणारी आव्हाने, डिजिटल ॲपचा प्रत्यक्ष वापर आणि नागरिकांशी संवाद साधण्याची पद्धत याचे प्रात्यक्षिक फील्ड ट्रेनर्स यांनी पूर्ण केले. यावेळी आगामी जनगणना कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे मत फील्ड ट्रेनर्स यांनी व्यक्त केले. हे प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्स आता पुढील टप्प्यात जिल्ह्यातील प्रगणक (Enumerators) यांना प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहेत.
या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी तृप्ती धोडमिसे व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व फिल्ड ट्रेनर्स यांना पुढील कामासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. या प्रसंगी तहसिलदार तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी चैताली सावंत महसूल यांची उपस्थिती होती.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, यांच्‍या हस्‍ते फिल्ड ट्रेनर्स यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र वितरणानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा अधिकृत समारोप करण्यात आला.
000000

You cannot copy content of this page