चार वर्षांनंतर पंचायत समितीची ‘नवी सुरुवात’…

पहिल्याच सभेत प्रशासनाला सुनावणी:शेतकरी, पाणीपुरवठा व योजनांवर जोरदार चर्चा; सभापती गणेश राणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश..

⚡देवगड ता.०८-:
चार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर देवगड पंचायत समितीची मासिक सभा आज छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली ही पहिलीच सभा ठरल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते. यावेळी उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, सहाय्यक प्रशासन अधिकारी कुणाल मांजरेकर, सभापती सहाय्यक दीपक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, रविंद्र तिर्लोटकर, विष्णू घाडी, सादिक डोंगरकर, अंकुश ठुकरूल, संजना आळवे, समृद्धी चव्हाण, शीतल तावडे, स्नेहा अनभवणे, सलोनी तळवडेकर, ऋतुजा खाजनवाडकर, संजना लाड यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
सभेत बोलताना सभापती गणेश राणे यांनी अधिकारी वर्गावर थेट टीका करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधताना सौजन्याची भाषा वापरणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना या जनतेसाठी असून त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. काही मंडलांमध्ये पीक विम्याचे पैसे मिळतात तर काही ठिकाणी मिळत नाहीत, ही विषमता का निर्माण होते, याचा शोध घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच कृषी योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लाभार्थ्यांना समजावून सांगावी, असेही त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष वेधताना त्यांनी औषध कंपन्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोठ्या सवलती देऊन विकली जाणारी काही औषधे परिणामकारक नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा औषधांची तपासणी करूनच त्यांचा वापर करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर सभेत जोरदार चर्चा झाली. तालुक्यातील अनेक भागांत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत असून, बैठका घेऊनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त केली. मुटाट राणेवाडी येथे पंधरा दिवसातून एकदाच पाणी येते, ही तक्रार तालुकास्तरावर येते कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जल जीवन मिशनची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, असे सांगत मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले.
आरोग्य विभागात अपुऱ्या मनुष्यबळामुळे समस्या निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या भरती प्रक्रियेत ज्या गावांमध्ये कर्मचारी कमी आहेत, त्या गावांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
हवामानातील बदलामुळे आंबा व काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सदस्य सदाशिव ओगले यांनी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली २२ हजार रुपयांची नुकसान भरपाई अपुरी असल्याचे सांगितले. हेक्टरी दोन लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केवळ कागदोपत्री कामे दाखवून विकास झाल्याचे चित्र उभे केले जाते, प्रत्यक्षात मात्र अनेक कामे अपूर्ण आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मुणगे पंचायत समिती गणामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत कामे रखडल्याचा मुद्दा उपस्थित करत सरपंचांची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी ओगले यांनी केली. सहा महिने प्रस्ताव न गेल्यास विकास कसा होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उपसभापती अमोल लोके यांनी कृषी विभागाला सूचना देताना विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या धर्तीवर कोकणातील शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागाचा आढावा सादर करताना गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे यांनी ५३९ शिक्षक पदांपैकी ४४१ शिक्षक कार्यरत असून ९८ पदे रिक्त असल्याचे सांगितले. २२ केंद्रप्रमुखांपैकी केवळ ५ कार्यरत असून उर्वरित पदे रिक्त आहेत. तालुक्यात १२ शाळांच्या छप्पर दुरुस्तीची कामे मंजूर आहेत. समाजकल्याण योजनेंतर्गत १३८० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज केले असून इयत्ता चौथीचे ७११ व इयत्ता सातवीचे ३४० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पुरळ गावातील जल जीवन मिशन कामाबाबत ग्रामपंचायतीला माहिती नसल्याचा मुद्दा सदस्य रविंद्र तिर्लोटकर यांनी उपस्थित केला. यावर सभापती गणेश राणे यांनी हा प्रश्न संपूर्ण तालुक्याचा असल्याचे नमूद करत सर्व गणांमध्ये लवकरात लवकर आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले.
सभेच्या शेवटी पंचायत समिती सदस्यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या व प्रलंबित कामांबाबत माहिती देत ती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

You cannot copy content of this page