⚡दोडामार्ग ता.०८-:
तालुक्यातील ग्रामविकासाला गती देण्यासाठी पंचायत समिती दोडामार्ग अंतर्गत सरपंच समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली असून उपसभापती गणेशप्रसाद शंकर गवस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावपातळीवरील विविध प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्यास मदत होणार असून प्रशासन आणि ग्रामपंचायती यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार आहे असल्याचेही यावेळी उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले.
या नव्याने गठित करण्यात आलेल्या सरपंच समितीत एकूण १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून विविध गावांतील सरपंचांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. समितीतील सदस्यांमध्ये अनिल दत्ताराम शेटकर, छाया सखाराम धर्णे, बळीराम कृष्णा शेटये, अस्मिता अनिल गवस, सुजल सूर्यकांत गवस, हरिश्चंद्र गंगाराम नाईक, वंदना आनंद सावंत, अजित मनोहर देसाई, स्नेहा सहदेव गवस, श्रीनिवास मुकुंद शेटकर, सुरेंद्र संभाजी सावंतभोसले, श्रुती विठ्ठल देसाई, पराग महादेव गावकर, प्रकाश जयाराम कदम, देवेंद्र रामकृष्ण शेटकर यांचा समावेश आहे.
ही समिती ग्रामपातळीवरील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करणार आहे. याशिवाय ग्रामस्थांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची जबाबदारीही समितीवर राहणार आहे. स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ही सरपंच समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. नव्या समितीकडून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, संजय सातार्डेकर, आदर्श गाव केरचे उपसरपंच तेजस देसाई, कोनाळ उपसरपंच रत्नकांत कर्पे, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, यांसह अनेक सरपंच उपस्थित होते.
