एलईडी लाईट मत्स्यव्यवसायिकांचे सत्ताधाऱ्यांशी लागेबंधे :माजी आमदार वैभव नाईक यांची टीका..
⚡मालवण ता.०८-:
गेले दोन वर्षे मत्स्यमंत्री असणाऱ्या ना. नितेश राणे यांनी दोन वर्षात कधीही मच्छिमारांचा विचार केला नाही. बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारीचा हैदोस वाढला असून या विरोधात उबाठा शिवसेनेने मोर्चा काढण्याचे जाहीर केल्यानंतर मत्स्यमंत्र्यांना जाग आली असून त्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन एलईडी लाईट मासेमारी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मान्य करत कारवाईचे आदेश दिले, एलईडी लाईट मत्स्यव्यवसायिकांचे सत्ताधाऱ्यांशी लागेबंधे असल्यामुळेच कारवाईत अडचणी येत आहेत, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील उबाठा शिवसेना शाखेत बोलताना केली.
मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखा कार्यालयात माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, पूजा करलकर, स्वप्नील आचरेकर, हेमंत मोंडकर, वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, महेश देसाई, बंड्या सरमळकर, गौरी मयेकर, विशाल सरमळकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, उबाठा शिवसेनेने १० एप्रिल रोजी एलईडी लाईट मासेमारी विरोधात मोर्चा काढून आवाज उठविण्याचे जाहीर केल्यावर मच्छिमारांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. मोर्चामध्ये जास्तीत जास्त मच्छिमार आणि सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा, कारण एलईडी लाईट मासेमारीवर आताच आवाज उठवला नाही तर भविष्यात छोटी छोटी बंदरे ओस पडतील. सत्ताधाऱ्यांवर आताच अंकुश ठेवला नाही तर सत्ताधारी कायम एलईडी लाईट मासेमारीला पाठीशी घालत राहतील. सत्ताधाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून आणि त्यांच्या बॅनरवर आपले फोटो लावून एलईडी धारक उन्मत्तपणे फिरत आहेत. मालवण मधील एका नगरसेवकाचे चार एलईडी लाईट नौका आहेत तर देवगड मधील एक नगरसेवक एलईडी लाईट मासेमारीसाठी डिझेल पुरवठा करत आहे. एलईडी लाईट धारक मत्स्यव्यवसायिकांचे सत्ताधाऱ्यांशी लागेबंधे असल्यामुळेच कारवाई करण्यात अडचण येत आहे, अशी टीका वैभव नाईक यांनी केली.
एलईडी लाईट विरोधात उबाठा शिवसेनेने पुढाकार घेत मोर्चाचे आयोजन केले आहे. एलईडी लाईट मासेमारीवर कारवाई व्हावी, डिझेलचे वाढलेले दर कमी व्हावेत या मागण्यांसाठी हा मोर्चा असून मच्छिमार संघटनांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षभेद विसरून मोठ्या संख्येने मच्छीमारांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी यावेळी केले.
