कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य कार्यक्रम…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती:पुस्तक भेट उपक्रम आणि सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आकर्षण..

⚡कणकवली ता.०८-: कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल रोजी कणकवलीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते.

यावेळी सावंत यांनी सांगितले की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ न आणता पुस्तक भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असून, जमा झालेली पुस्तके जिल्ह्यातील ग्रामीण ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा भव्य सोहळा १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर होणार आहे.

यावेळी बॉलीवूड अभिनेता संजय दत्त तसेच ख्यातनाम गायक सोनू निगम यांचीही उपस्थिती राहणार असून, राजकीय कार्यक्रमानंतर सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट (संगीत रजनी) आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.

हा सोहळा केवळ राजकीय मर्यादेत न राहता सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांसाठी स्नेहमेळावा ठरावा, या उद्देशाने नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी भव्य बैठक व्यवस्था करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासदार नारायण राणे हे संपूर्ण कोकणचे प्रेरणास्थान असून, त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा ठरावा, या हेतूने पुस्तक भेटीचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page