Headlines

इन्सुली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०७-: इन्सुली-सावंतटेंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १० येथे सुयश हॉस्पिटल कुडाळ, बांदेश्वर डायग्नोस्टिक पॉलिक्लिनिक व आयकेअर सेंटर बांदा तसेच पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे मित्र मंडळ, इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे आयोजन पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मधुमेह, काचबिंदू, पापणीचे आजार, दुखापती, मुतखडा, लहान मुलांचे व स्त्रियांचे आजार, किडनी विकार, रक्तदाब तसेच हृदयविकारासाठी ईसीजी तपासणी अशा विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. इन्सुली परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
यावेळी डॉ. संजय केसरे व डॉ. जयश्री केसरे यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना सदाशिव राणे यांनी, “सध्याच्या काळात कमी वयातही हृदयविकार, किडनीसारखे गंभीर आजार आढळून येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी,” असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर अल्पिता कोटणीस, सतीश मोरजकर, नेत्रा राणे, सुंदर आरोसकर, सचिन नेवगी, लता सावंत, प्रणव राणे, सचिन देसाई, आशिष मोरजकर, नेहा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे इन्सुली परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
फोटो:-
इन्सुली येथे रुग्णाची तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी व मान्यवर.

You cannot copy content of this page