बंधाऱ्यावरून जाताना दुचाकी घसरली…

शिवडाव जाधववाडी येथील १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू..

⚡कणकवली ता.०७-: तालुक्यातील गड नदी पात्रात शिवडाव ते सांगवे दरम्यानच्या कच्च्या बंधाऱ्यावरून जात असताना दुचाकी घसरल्याने १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. उत्कर्ष मनोहर जाधव (वय १७, रा. शिवडाव – जाधववाडी) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्ष हा आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवरून कणकवलीहून शिवडावकडे जात होता. गड नदीतील कच्च्या बंधाऱ्यावरून जात असताना दुपारी सुमारे १.३० वाजता दुचाकी अचानक घसरली. यावेळी उत्कर्षची एक चप्पल पाण्यात पडली. ती काढण्यासाठी तो खाली उतरला असता त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला.

उत्कर्षला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. ही घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून स्थानिकांना पाचारण केले. स्थानिकांनी तातडीने नदीपात्रात उतरून उत्कर्षला बाहेर काढले व कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

उत्कर्ष जाधव हा कणकवली येथील महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण तसेच आजी-आजोबा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page