साकेडी फाट्यावर पहाटे अपघात…

अज्ञात वाहनाच्या धडकेत टेम्पो चालक गंभीर जखमी..

⚡कणकवली ता.०६-: मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली साकेडी फाटा येथे सोमवारी पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोंडा येथील योगेश प्रभूदेसाई यांच्या टेम्पोवर मगदूम महम्मद अली शेख (रा. कोलगाव फणसवाडी) हे चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी पहाटे मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांनी साकेडी फाटा येथे चहासाठी टेम्पो थांबवला होता. चहा घेतल्यानंतर ते पुन्हा गाडीत बसून टेम्पो सुरू करत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या केबिनला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात शेख यांच्या हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या वेळी परिसरात अंधार असल्यामुळे धडक देणारे वाहन कोणते होते, हे स्पष्ट होऊ शकले नाही. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी मगदूम शेख यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page