कणकवली – सावंतवाडीतील सलग दुकानफोड्या; एकाच टोळीचा संशय, पोलिसांचा ‘अलर्ट मोड’…

⚡कणकवली ता.०५-: कणकवली शहरातील तब्बल दहा दुकाने फोडल्याच्या घटनेला २४ तासही उलटत नाहीत तोच सावंतवाडी शहरातही सहा दुकाने चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घडामोडींमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून दोन्ही ठिकाणच्या घटना एकाच टोळीने केल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.

कणकवलीत सना कॉम्प्लेक्ससह अन्य एका कॉम्प्लेक्समधील मेडिकल, जनरल स्टोअर्स, हॉटेल आदी मिळून सुमारे दहा दुकाने शनिवारी पहाटे फोडण्यात आली होती. या चोरीत अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे दोन ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्या चेहऱ्यांचे स्पष्ट फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे सावंतवाडी शहरातील सहा दुकाने फोडल्याचे उघड झाले. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्येही चोरटे कैद झाले असून कणकवलीतील आरोपींशी त्यांचा साम्य आढळून आला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकाच टोळीने चोरी केल्याचा संशय अधिक बळावला आहे.

या पार्श्वभूमीवर कणकवली व सावंतवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) सक्रिय झाली आहे. विविध दिशांनी तपास मोहीम राबवण्यात येत असून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित टोळी परप्रांतीय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, एलसीबीची विशेष पथके चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाली असून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तपासाच्या गोपनीयतेमुळे पथक कोणत्या दिशेने गेले याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र, ही टोळी लवकरच जेरबंद होईल, असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page