मिलिंद नाईक:तेंडोली महोत्सव २०२६ चा शानदार शुभारंभ..
कुडाळ : तेंडोली हे कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर निसर्गरम्य असे गाव आहे. तेंडोली गावाकडे बघताना आम्ही रत्नाची खाण म्हणून बघतो. अनेक रत्न या गावात नावारुपाला आली. दशावतार क्षेत्रात तर अनेक कलावंत या गावात आहेत. रत्नाची खाण असलेले हे गाव आणि गावात साजरा होणारा हा तेंडोली महोत्सव निश्चितच गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार आहे. असे प्रतिपादन कुडाळ तालुका पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी तेंडोली येथे व्यक्त केले.
तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेथीलच श्री देव रवळनाथ पंचायतनच्या प्रांगणात “तेंडोली महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे पर्व आहे. या महोत्सवाचे उदघाटन सभापती श्री. नाईक व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या महोत्सवात शोभायात्रा, वेशभुषा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खेळ पैठणी, एकपात्री अभिनय स्पर्धा, आरोग्य शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जि. प. सदस्या आरती पाटील, उद्योजक प्रसाद नाईक, राजू राऊळ, राजन नाईक, पं. स. सदस्य मंगेश उर्फ भाऊ प्रभू, पं. स. सदस्या प्रियांका जळवी, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, सरपंच अनघा तेंडोलकर, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, ग्रा. पं. सदस्या उत्कर्षा प्रभू, माजी पं. स. सदस्या माधवी प्रभू, शिंदे शिवसेना तेंडोली विभाग प्रमुख रामचंद्र राऊळ, चेअरमन संजय प्रभू, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद राऊळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरुण राऊळ, खर्डेकर कॉलेज (वेंगुर्ले) चे निवृत्त प्राचार्य प्रदीप होडावडेकर, सहदेव धर्णे, प्रसाद सातार्डेकर, विष्णू तेंडोलकर, सत्यवान तेंडोलकर आदी उपस्थित होते. सभापती श्री. नाईक यांचा मंगेश प्रभू यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. नाईक म्हणाले, ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तो उद्देश नक्कीच यशस्वी होईल. या गावातील बरेचसे लोक शेतकरी, बागायतदार आहेत. या सर्व लोकांच्या माध्यमातून हा मोहोत्सव होत आहे निश्चितच हे कौतुकास्पद आहे.या गावातील पं. स. सदस्य मंगेश प्रभू व सरपंच अनघा तेंडोलकर या गावाच्या विकासाठी नेहमीच झटत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर महिलांना व युवतींना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा कार्यक्रमातून गावातील तरुण-तरुणी व महिला जेव्हा पुढे येतील आणि गावाचे नाव जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात चमकेल तेव्हा खऱ्या अर्थाने हा तेंडोली महोत्सव यशस्वी झाला असे वाटेल. सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घेऊन हा महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बीडीओ प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, खरोखरच सुंदर फ़ंडा तुम्ही निर्माण केला आहे. तेंडोली गाव हे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव आहे. निसर्गाच्या कोंदणात वसलेले हे गाव आहे. त्यामुळे निसर्गाचे वरदान या गावाला मिळाले आहे. कोणातील विविध वैशिष्ट्य फळे येथे मिळतात. आंबा, काजू, सुपारी, नारळ, मसाले यांसारखी पिके चांगल्या प्रकारे येथे होतात. या गावात दशावतार कलेची जपणूक केली जाते. दशावतार कलाकार, कीर्तनकार, भजनी बुवा या गावात आहेत. या गावाशी आपली पदावितिरीक्त नाळ जोडलेली आहे. हा महोत्सव तुम्ही दरवर्षी सातत्याने घेत रहा. सर्व कलाकारांना एकत्र आणा. विद्यार्थ्यांमध्ये कला रुजतील यासाठी गावात कलादालन सुरु करा. जेणेकरून सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या गावाची ओळख निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
आरती पाटील म्हणाल्या, विविध कार्यक्रमांनी नटलेला हा महोत्सव आहे. अशा कार्यक्रमातून गावाची एकजूट राहते. या कार्यक्रमातून महिला, पुरुष, युवक, युवती एकत्र येत असतात. त्यामुळे सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होत असते, असे सांगून त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. संजय वेंगुर्लेकर म्हणाले, आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे जतन व्हावे यासाठी हा कार्यक्रम आहे. तेंडोली गावची रत्न विविध क्षेत्रात चमकली आहेत. अनेक क्षेत्रात येथे कलाकार घडून गेले. दशावतार, संगीत क्षेत्रात, भजन, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात कलाकार येथे घडले आहेत. तेंडोली गाव आंदुर्ले गावाची परंपरा घेऊन पुढे चालत आहे. तालुका, जिल्हा पातळीवर या गावातील विद्यार्थी चमकत आहेत. त्यात कुठेही खंड पडता कामा नये, असे त्यांनी सांगितले. अनघा तेंडोलकर यांनी गेल्यावर्षीपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. आंदुर्ले गावाची प्रेरणा घेऊनच या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या महोत्सवातून गावातील लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिलांना व विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. सर्वांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राजू राऊळ यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक मंगेश प्रभू यांनी केले. सूत्रसंचालन राधाकृष्ण परब यांनी, तर आभार विष्णू तेंडोलकर यांनी मानले.
