निरवडे महोत्सवात लोककला, संगीत आणि गुणवंतांच्या सन्मानाने रसिक मंत्रमुग्ध…

महिला बचत गट आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गौरव;दोन दिवस चालला सांस्कृतिक जागर…

⚡​सावंतवाडी,ता.०५-: निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘निरवडे महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावत ग्रामीण भागातील या कलाविष्काराचे आणि मंडळाच्या भव्य नियोजनाचे तोंडभरून कौतुक केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे शानदार उद्घाटन भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल निरवडेकर होते, तर यावेळी व्यासपीठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, तळवडे जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप गावडे, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, माजी सभापती पंकज पेडणेकर, दादा परब, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सरपंच सुहानी गावडे आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर महेंद्र गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे निरवडे गावातील विविध व्यवसाय करणाऱ्या आणि स्वतःच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाला दाद देण्याच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य, देवगड येथील सुप्रसिद्ध ‘पावणादेवी समई नृत्य’ आणि नेरूर येथील ‘शिमगोत्सव’ या कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी महोत्सवाला सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, अशा महोत्सवांमुळे ग्रामीण संस्कृतीला बळकटी मिळते असे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे रजुल पाटणकर आणि पत्रकार अमोल टेंबकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
​महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची रंगत अधिकच वाढली, जेव्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, पुणे येथील ख्यातनाम शास्त्रीय गायक नागेश आडगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, स्वर्गीय प्रकाश परब फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज परब, संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री आणि संगीत विशारद रुपेंद्र परब यांच्या उपस्थितीत दुसऱ्या सत्राचा शुभारंभ झाला. संजू परब यांनी यावेळी बोलताना निरवडे सारख्या ग्रामीण भागात एवढा मोठा ‘शिवधनुष्य’ पेलणे सोपे काम नाही, अशा शब्दांत मंडळाचे कौतुक केले आणि भविष्यात कोणत्याही हाकेला धावून येण्याचा शब्द दिला. या दिवशी निरवडे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विशेष सेवेबद्दल गौरव करण्यात आला. त्यानंतर नागेश आडगावकर यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाने पूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला, ज्याला संगीतप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर ओंकार कला मंच सिंधुदुर्ग यांचा नृत्य नाट्य आणि कलाविष्काराचा कार्यक्रम संपन्न झाला त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महोत्सवाच्या समारोप प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, मधुकर देसाई, शरद धाऊस्कर, हेमंत मराठे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विनायक गावस, भुवन नाईक, प्रणव तारी आणि डॉ. अक्षय मिसाळ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या ‘लकी ड्रॉ’ च्या सोडतीने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती, ज्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निखिल माळकर, सचिव संदेश पोपकर, खजिनदार सुनील माळकर, मार्गदर्शक ओमप्रकाश तीवरेकर, चंदन गोसावी, सचिन माळकर, विशाल पोपकर, नितेश माळकर, चेतन माळकर, विराज पोपकर, संजय माळकर, राजाराम माळकर आदी कार्यकर्त्यांसह गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली. संपूर्ण महोत्सवाचे ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन राजा सामंत, निलेश गुरव, बादल चौधरी आणि श्रीधर पाचंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओमप्रकाश तीवरेकर यांनी करून या ऐतिहासिक महोत्सवाची सांगता झाली.

You cannot copy content of this page