⚡सावंतवाडी ता.०५-: तालुक्यातील राणी पार्वतीदेवी हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी जान्हवी विश्वास पाटील हिने डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या तोंडी परीक्षेत कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्याकडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली जाते. सन २०२५-२६ यावर्षीच्या स्पर्धेसाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या जान्हवी पाटील हिने प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून तिची निवड तोंडी परीक्षेसाठी निवड झाली होती. या परीक्षेमध्येही कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक कमाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कु. योगेश जोशी नंतर जान्हवी पाटील हिने केलेल्या सुवर्णमय कामगिरीमुळे प्रशालेने सलग दोन वर्षे या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. अक्षयऊर्जा स्त्रोतांच्या कार्यक्षमतांचे मूल्यांकन या विषयावरील *कुजलेल्या अवशेषांतून निळ्या ज्योतीकडे, बायोगॅस कार्यक्षमतेच्या नव्या वाटेचा वैज्ञानिक प्रवास या शीर्षकाचा कृती संशोधन प्रकल्प अहवाल सादर केला होता. या यशस्वीतेसाठी व आरपीडी प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल जान्हवी विश्वास पाटील हिचे तसेच पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक एन. जी. मुठे व सर्व संस्था सदस्य तसेच पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आरपीडीच्या जान्हवी पाटीलने पटकाविले सुवर्णपदक…
