‘इतिहास कट्टा’चा कुडाळमध्ये शुभारंभ…

शिवचरित्रातून इतिहासाची उजळणी..

कुडाळ : इतिहासाची गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इतिहास कट्टा’ या उपक्रमाची सुरुवात कुडाळ येथे उत्साहात करण्यात आली. शिवप्रेमी संघटना आणि इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, ३ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधून जशी इतिहासाची ओळख मनात रुजते, त्याच धर्तीवर इतिहास अधिक जिवंत आणि समजण्यास सोपा व्हावा, या उद्देशाने ‘इतिहास कट्टा’ची संकल्पना साकारण्यात आली आहे. उपक्रमाच्या पहिल्याच भागात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या चरित्राचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
प्रखर अभ्यासक वक्ते रविराज पराडकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीने छत्रपती शिवरायांचे विविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. तब्बल सव्वातास चाललेल्या त्यांच्या व्याख्यानाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरातत्त्वविद्वान डॉ. अरविंद जामखेडकर होते. त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाची गरज अधोरेखित करत उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोंकण प्रांत संघचालक बाबा चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालून एकात्म भारताच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारत माता तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. इतिहास संकलन समितीचे प्रांत सचिव चंद्रकांत जोशी यांनी देश-कालोच्चारण व संकल्पाचे सामूहिक उच्चारण केले.
यावेळी डॉ. जामखेडकर, बाबा चांदेकर आणि प्रमुख वक्ते रविराज पराडकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी रविराज पराडकर यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’च्या सुमधुर गायनाने वातावरण भारावून गेले.
या उपक्रमाला कुडाळवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लऊ म्हाडेश्वर यांनी केले, तर आभार प्रदर्शन इतिहास संकलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ बापू भोगटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्गचे सचिव कमलेश चव्हाण, रमा नाईक, सुभाष वाटवे आदींसह कार्यकर्त्यांनी काम केले. या कार्यक्रमात कसाल येथील ओंकार कदम याच्या इतिहासकालीन तसेच इतर देशांची नाणी आणि चलने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार आदीच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
‘इतिहास कट्टा’च्या पुढील भागाबाबत उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, हा उपक्रम इतिहासप्रेमींना एक नवे व्यासपीठ ठरणार आहे.

You cannot copy content of this page