⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणी नंतर सुरू झाले आहे. मात्र या रस्ता कामाच्या साईड वॉलमध्ये काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर होत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिला होता. खोबरेकर यांच्या या दणक्यानंतर पतन विभागाकडून हे निकृष्ट काम हटवण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निकृष्ट कामांवर यापुढेही वचक ठेवणार असून शासनाच्या तिजोरीतून ठेकेदारांची पोटे भरू देणार नाही, असा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी हरी खोबरेकर यांनी वायरी येथे कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता येथे रस्त्याच्या साईड वॉलच्या कामात काँक्रिट मध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभा दगड वापरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच कामाच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची वाळू वापरण्यात आली असल्याचे खोबरेकर यांनी म्हटले होते. हे काम आता पत न विभागाने काढून टाकले आहे. याबद्दल हरी खोबरेकर यांनी समाधान व्यक्त केले असून यानंतर देखील तालुक्यात विकास कामात भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. जनतेच्या हितासाठी आमचा पक्ष आणि आमचे शिवसैनिक नेहमीच जागरूक असणार असल्याचेही तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले.
