पालकमंत्री नितेश राणे:’रिल्स मालवणी’चा शानदार मालवणी अवॉर्ड्स सोहळा..
⚡कुडाळ ता.०५-: मराठी भाषा भवनाप्रमाणे लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे केली. मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मालवणी भाषा दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथे रिल्स मालवणीच्या वतीने शनिवारी रात्री मालवणी अवॉर्ड शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ दशावतारी कलाकार कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण याना कला सिंधू सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर रिल्स मालवणी तर्फे विविध बारा मालवणी कॅटेगिरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट रीलचा मान साळगावची आडसरा यांना मिळाला.
मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस हा मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून रिल्स मालवणी तर्फे दरवर्षी मालवणी अवॉर्ड शो आयोजित केला जातो. यंदा देखील सलग चौथ्या वर्षी रिल्स मालवणी यांच्या वतीने येथील मराठा समाज सभागृहात शनिवारी सायंकाळी रिल्स मालवणी अवॉर्ड सोहळा अतिशय उत्साही आणि उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अगदी मराठा समाज सभागृहाच्या प्रवेशद्वारापासूनच दशावतारातील शंखासूर येणाऱ्यांचे स्वागत करत होता. रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर यांच्या हस्ते आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून रंगमंच पूजन करण्यात आले. त्यानंतर लेखक दिगदर्शक केदार देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मच्छिन्द्र कांबळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, अतुल बंगे, प.स. सदस्य अर्चना बंगे, संध्या तेरसे, नगरसेविका नयना मांजरेकर, उद्योजक प्रदीप माने, किरण कुडाळकर, कविता जोशी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत तुषार तळकटकर यांनी केले. केदार देसाई, संध्या तेरसे, प्रफुल्ल वालावलकर यांनी आपली मनोगतातून सर्वाना मालवणी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन रिल्स मालवणीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
पालकमंत्री नितेश राणे यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते यंदाचा कला सिंधू सन्मान पुरस्कार ज्येष्ठ दशावतारी कलाकार कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण याना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. केदार देसाई यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. ओमप्रकाश चव्हाण यांनी स्त्री वेषात येऊन हा पुरस्कार स्वीकारला. ओमप्रकाश चव्हाण यांनी आपल्या अभिनयाची झलक देखील यावेळी सादर केली. यावेळी व्यासपीठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, संध्या तेरसे, जि प सदस्य रुपेश कानडे, प्रफुल्ल वालावलकर, संध्या तेरसे, केदार देसाई, किरण कुडाळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वाना मालवणी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी भाषा भवनाप्रमाणे कोकणात मालवणी भाषा भावनाची आवश्यकता आहे. ते उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याला चांगले मालवणी बोलता येत नाही पण पुढच्या वर्षी चांगले मालवणी बोलून दाखवेन असे सांगितले.
संदेश पारकर म्हणाले, मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांनी मालवणी भाषा साता समुद्रापार पोहोचवली. त्यांच्या नावाने कुडाळ मध्ये मच्छिन्द्र कांबळी अकादमी होणार असे कानावर आले होते. ती लवकर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून रिल्स मालवणीचे कौतुक केले.
पुरस्कार प्राप्त ओमप्रकाश चव्हाण यांनी मालवणी भाषेचे महत्व अधोरेखित करताना मालवण मध्ये झालेल्या नाट्य संमेलनातील एक आठवण सर्वांशी शेअर केली. त्यावेळी मच्छिन्द्र कांबळी यांनी दशावतारी नाटक देखील मालवणीतुन करायला सांगितले होते. ती भूमिका आणि त्यातील गाणी देखील आपण कशी मालवणीत सादर केली होती याची आठवण तयांनी सांगितली.
यावेळी विविध कॅटेगिरीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष – मंदार शेट्ये, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत – आवशीचो घो (चित्रपट दशावतार), सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार – संदेश वेंगुर्लेकर, सर्वोत्कृष्ट मालवणी चित्रपट – कुर्ला टू वेंगुर्ला, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका – रेशन कार्ड, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता – सचिन वळंजू, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री – हिमांगी सुर्वे, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब – सत्यवान गावकर परिवार, सर्वोत्कृष्ट मालवणी वेबसीरीज – समर ऑफ कोकण, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्यसंस्कृती – आम्ही मालवणी, कणकवली, सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म – पाणखोल यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांना रिल्स मालवणी ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि कोकण मसाले यांच्या तर्फे गिफ्ट हॅम्पर देखील देण्यात आले.
रिल्स मालवणी तर्फे कोकण वाचवा या विषयावर रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. साळगावची आडसरा हे या स्पर्धेचे विजेते ठरले. त्यांना ‘शंखासुरा’च्या हस्ते पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील विविध डान्स गृपनी यावेळी आपले एकापेक्षा एक सुंदर नृत्याविष्कार सादर केले. समर्थ गवंडी यांनी सादर केलेल्या दशावतारी कलाकारावरच्या नृत्याने सर्वांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार तळकटकर यांनी केले. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, क्रिएटिव्ह हेड तेजस मसके, निलेश गुरव, रामचंद्र आईर, रुचिता शिर्के, पूजा सावंत-उपळेकर, चांदणी कांबळी, शरावती शेट्टी, उपेंद्र पवार, मनीष पाटकर, रामचंद्र राणे, भावेश तळवळकर, किरण मेस्त्री, ओंकार मसके, किशोर नाईक, परशुराम पुजारी, रामचंद्र आईर, रोहन नेरुरकर, गौरव पाटकर, साईराज नाईक, आशिष करंगुटकर, विश्वजीत पालव, तुषार देवळी, कौस्तुभ कुडतरकर, हर्षवर्धन जोशी, कौस्तुभ राठोड, रोहन नेरुरकर, सचिन कोंडसकर, रमेश घाडी, रोशन चव्हाण, समर्थ गवंडी, सचिन तळवळकर, अभिषेक चव्हाण, गौरव पाडवे उपस्थित होते.
