वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी कोकण विकास संस्थेचा “सक्षम बुक बँक” उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.०५-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकारातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी “सक्षम बुक बँक” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ वाचनालयांना सुमारे १००० हून अधिक पुस्तके भेट देण्यात आली.
याच अनुषंगाने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील वाचनालयास संस्थेच्यावतीने पुस्तके प्रदान करण्यात आली. यावेळी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे चे माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे पर्यवेक्षक सुबोध वराडकर, सहाय्यक शिक्षक गोपाल गवस, पी. बी. बाबुल, अनिल ठाकूर तसेच कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत, संस्था प्रतिनिधी वैष्णवी म्हाडगुत, शुभम लोणाग्रे, समीर शिर्के आदी मान्यवरांसह शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. प्रथमेश सावंत यांनी “सक्षम बुक बँक” उपक्रमाची माहिती देत वाचनसंस्कृती अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. दत्तप्रसाद गोठोसकर यांनी कोकण संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानवाटपाची चळवळ अधिक सक्षम होऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.
आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत चालली असताना, वाचनामुळे ज्ञानवृद्धी, विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. नियमित वाचनामुळे व्यक्तीमत्त्व घडते,भाषेवर प्रभुत्व मिळते तसेच चांगले संस्कार रुजण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. या उपक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूल, प्रा.रमेश चिटणीस वाचनालय यांसह विविध वाचनालयांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या विचारांची समृद्धी व सुसंस्कार जोपासण्यास मोठी मदत होणार आहे.

You cannot copy content of this page