देवबाग, वायरीतील बाधिताना पत्रे, ताडपत्री, रोख रक्कमेची केली मदत
मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाने मालवण तालुक्यात मोठे नुकसान केल्याने मालवणच्या पाहणी दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी देवबाग, वायरी गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्त ग्रामस्थांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर दिला. तसेच नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार पत्रे, ताडपत्री, रोख रक्कम यासह अन्नधान्य, किराणा माल यांचे वाटप केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष अशोक सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, बाबू बिरमोळे, अवि सामंत आदी व इतर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले तालुक्यात वादळामुळे मोठे नुकसान झाले असल्याने शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री फक्त इथे येऊन उभे राहून जात आहेत. ताडपत्री विकणाऱ्या शिवसेनेला लाज वाटली पाहिजे मदतीच्या निमित्ताने शिवसेनेने बाजार चालविला असून आमदारांच्या एजन्सीचा सिझन आला आहे. शासन केवळ पंचनामे करत असताना आम्ही भाजप कडून शक्य तेवढी मदत करत आहोत.वादळग्रस्ताना नुकसान भरपाई देण्यासाठी निकष बदलून भरपाई दिली पाहिजे मात्र कोकणसाठी निकष बदलण्यासाठी इथल्या सत्ताधारी शिवसेना आमदार, खासदारांमध्ये तेवढी हिंमत नाही, सरकारमध्ये त्यांचे वजन नाही. कोकणने शिवसेनेला भरभरून दिले असताना मुख्यमंत्री नुकसानग्रस्ताना न भेटताच निघून गेले. दोन दिवसात मदत देऊ असे मुख्यमंत्री सांगून गेले. मात्र, अद्याप कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे अश्या मुख्यमंत्र्यांकडून जनतेला कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. कोकणी जनतेने शिवसेनेला मते दिली, पण शिवसेनेने कोकणला काय दिले ? मुख्यमंत्री प्रेमळ असले तरी जनतेला प्रेम नको काम हवे आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मदत मिळवून देण्याचे काम करावे. भिकाऱ्याकडे मागायचे नसते, तो काही देऊ शकत नाही, असे खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, असा टोलाही यावेळी निलेश राणे यांनी लगावला. तसेच डिजीसीए ची परवानगी नसताना मुख्यमंत्र्यांचे विमान चिपी विमानतळावर उतरलेच कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारमध्ये कोणाला कशाचा अंकुश नाही. नुकसानी बाबत प्रशासन माहिती लपवत असून केवळ आकडे सांगितले जातात. केंद्राकडून मदत मिळत नाही असे सांगणाऱ्या राज्य शासनाकडूनच नुकसानीचा सत्य व परिपूर्ण अहवाल पाठविला जात नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून १९९० मध्ये सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावाच्या किनाऱ्यावर संरक्षक बंधारा उभारला. गेल्यानंतर आजपर्यंत त्याठिकाणी एकही नवा दगड टाकण्यात आला नाही. बंधारा उध्वस्त झाला असताना शिवसेनेचे आमदार, खासदार बंधाऱ्याचे काम करू शकले नाहीत. मागणी करूनही प्रशासन त्यांचे ऐकत नाही. आमदार वैभव नाईक यांना प्रशासनात कोणी ऐकत नाही. वादळनंतर जनता नुकसानीशी सामना करीत असताना केवळ राजकीय व हेतूने व आपली ठेकेदारी सांभाळण्याकरीता पालकमंत्री उदय सामंत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मुंबईहून रत्नागिरीत आले. जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असताना कोरोना बाबत कोणतीही उपाययोजना पालकमंत्री करू शकले नाहीत. वादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करताना अधिकाऱ्यांशी बरीच फोनाफोनी करावी लागत असून आज भाजप नेते नारायण राणे पालकमंत्री असते तर अशी फोनाफोनी करावी लागली नसती, असेही निलेश राणे म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी फडणवीस यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत विधानसभा क्षेत्रात भाजप आमदार व भाजपा यांच्या माध्यमातून ३२ ऑक्सिजन बेडचे सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता प्राप्त झाल्यावर तसेच जागा उपलब्ध झाल्यावर ही सेंटर सुरू करण्यात येतील. मालवण मध्ये देखील असे सेंटर उभारण्यात येईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी दिली.
