राज्य शासनाचे विशेष अभियान:जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना सहभागाचे अध्यक्ष कामत यांचे आवाहन
⚡ओरोस ता ३०-: प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हे अभियान १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून “प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त” हे या अभियानाचे मुख्य ब्रीदवाक्य आहे. जिल्ह्यातील सर्व ४३१ ग्राम पंचायतींनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी दुपारी अध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कामत यांनी, हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून त्यामध्ये मूलभूत आरोग्य सेवा, पोषण व स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, जनजागृती, संगणकीकृत आरोग्य माहिती संकलन, प्रशिक्षण आणि शासन यंत्रणांमधील समन्वय या सर्व घटकांचा समावेश आहे. ग्रामीण भागात जागरूक, सशक्त आणि आरोग्यदायी समुदाय निर्माण करणे. क्षयरोग, कुष्ठरोग, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांसह मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांच्या निदान व उपचारांवर विशेष भर दिला जाणार आहे. १०० टक्के संस्थात्मक प्रसूती, संपूर्ण लसीकरण आणि माता-बाल मृत्यूदर शून्यावर आणणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. योग, आयुष, संतुलित आहार आणि व्यसनमुक्तीच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देश आहे, असे सांगितले.
चौकट
हे अभियान समुदाय सहभाग, आरोग्य सेवा, प्रशासकीय समन्वय, नवोपक्रम आणि परिणामकारक या पंचसूत्रीवर आधारित आहे. ’HMIS (e-Sushrut)’ प्रणालीद्वारे सर्व आरोग्य नोंदी संगणकीकृत केल्या जातील. याद्वारे डिजिटल आरोग्य केले जाणार आहे. हे ‘बॉटम टू अप’ पद्धतीचे अभियान असून ग्रामपंचायत हे याचे मुख्य एकक असेल. तळागाळातील नियोजन केले जाणार आहे. आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, महिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागांच्या समन्वयातून अभियान राबवले जाईल. याद्वारे आंतरविभागीय समन्वय साधला जाणार आहे.
पुरस्कार आणि मानांकन
अभियानात ७० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” म्हणून गौरविण्यात येईल. तसेच जिल्हास्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तरावर ग्राम पंचायतींना लाखो, कोठ्यांनी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषदांना राज्य स्तरावर कोठ्यांनी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांना संस्था स्तरावर सुद्धा बक्षिसे देण्यात येणार आहेत, असे यावेळी अध्यक्ष कामत यांनी सांगितले.
सहभागाचे आवाहन
सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होण्यासाठी १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. “आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती सार्वजनिक जबाबदारी आहे. आपल्या गावाला आरोग्य संपन्न करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ही अभियान राबविले जाणार आहे. १ एप्रिल पासून याला प्रारंभ होत असलातरी एप्रिल महिना राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर प्रशिक्षण कालावधी राहणार आहे. मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे यावेळी कामत यांनी सांगत आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी जोरदार काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियंत्रण व मूल्यमापन
जिल्हास्तरावर माननीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय “आरोग्य संपन्न गाव समिती” कार्यरत राहील. ही समिती संपूर्ण योजनेचे नियंत्रण व मूल्यमापन करेल. तसेच तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरही प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल
