डिंगणे-बांबरवाडीत गव्यांचा हैदोस…

बागायतीचे मोठे नुकसान: शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..

⚡बांदा ता.२९-: डिंगणे-बांबरवाडी परिसरात गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी सुनील धामापूरकर यांच्या माड व फोफळी बागायतीवर गव्यांच्या कळपाने हल्ला करून मोठे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास गव्यांचा कळप शेतात शिरला व त्यांनी माड व फोफळीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. यामध्ये अनेक झाडांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकत्याच वाढीस लागलेल्या झाडांवरही गव्यांनी हल्ला केल्याने भविष्यातील उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणेही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून गव्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page