तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी समन्वय गरजेचा…

गणेश राणे:देवगडमध्ये कृषी महोत्सव २०२६ उत्साहात..

⚡देवगड ता.२८-: शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. गावातील ग्रामसभांमध्ये कृषी सहाय्यकांनी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी व्यक्त केले.
देवगड तालुका कृषी विभागाच्यावतीने जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत कृषी महोत्सव २०२६ चे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन सभापती गणेश राणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अॅड. अजित गोगटे उपस्थित होते. व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके, जि. प. सदस्य देवदत्त कदम, सुनील पारकर, सावी लोके, पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, संजना लाड, शीतल तावडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष किंजवडेकर, उषःकला केळुसकर, शरद ठुकरूल, प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र वेंगुर्लेचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, रामेश्वर फळसंशोधन उपकेंद्राचे संशोधक डॉ. अजय मुंज, यशवंत गव्हाणे, उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, पं. स. कृषी अधिकारी दिगंबर खराडे, कृषी अधिकारी मानसी पवार, उपकृषी अधिकारी संभाजी जाधव, अमृत सागर, बापुसाहेब लांबडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते कृषी अवजारे व धान्य बियाणे प्रदर्शन, पाककला, रांगोळी प्रदर्शन तसेच विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. सभापती गणेश राणे म्हणाले, शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयातून शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. चायना बॅण्डची कृषी अवजारे वापरण्यापेक्षा पारंपरिक शेती अवजारांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अॅड. अजित गोगटे म्हणाले, कृषी महोत्सवातील प्रदर्शन पाहता येथील कृषी क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती होताना दिसत आहे. पारंपरिक बियाणे लोप पावत चालली असली तरी या प्रदर्शनात ती पुन्हा पाहायला मिळत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये मसाले पिकांवर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे आपल्या किनारी भागातही मसाले पिकांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. बचतगटांच्या उत्पादनांना योग्य मार्केटिंग मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून, यासाठी बचतगटांनीही पुढाकार घ्यावा, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही याची प्रमुख कारण म्हणजे तो आंबा व शेती यावरच अवलंबून नसून इतरही पिक, उत्पादन त्यासोबत घेत असतो त्यामुळे कोकणाला शेतकरी आत्महत्या पासून दूर असतो असेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. वैभव शिंदे व उमाकांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतीमध्ये परंपरागत तंत्रज्ञानासोबत आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सामूहिक शेतीकडे लक्ष देऊन प्रत्येक गावात गट स्थापन करून शेती करण्याचे आवाहन करण्यात आले. शासनाच्या नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना मोफत काजू व नारळाची रोपे उपलब्ध करून दिली जाणार असून त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी देवेंद्र तुकाराम नारकर (विठ्ठलादेवी) व रंजना रमेश कदम (इळये) यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच सन २०२४-२५ मधील तालुकास्तरीय भातपिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारे मंगेश महादेव वारीक (पडेल), द्वितीय क्रमांक लक्ष्मण शंकर राऊत (कोटकामते) व तृतीय क्रमांक दत्ताराम रावजी भाटकर (बागतळवडे) यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले. स्वागत उमाकांत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदीप कदम यांनी मानले.

You cannot copy content of this page