पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत ‘मन की बात’..
⚡कुडाळ ता.२८-: पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्याबाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली. मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले. यामध्ये विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात येऊन त्यांना आपल्या मार्फत बक्षीस योजना राबविण्याचे गुरु ठाकूर यांनी जाहीर केले.
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी मार्फत विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात . यामधूनच मराठी विषयाच्या विविध स्पर्धा आयोजित करून मराठीचे गोडी वाढावी याकरिता शिक्षक आणि गुरु ठाकूर यांची भेट घडून आणली. यामध्ये देश विदेशात फिरत असताना मराठी जतन करण्यासाठी होत असलेले विविध प्रयत्न गुरु ठाकूर यांनी सांगितले. आपल्या घरा जवळच्या पाट हायस्कूलमध्ये सुद्धा असे उपक्रम राबविल्यास मराठी मालवणी या बोलीभाषांचाही दर्जा वाढवण्यास मदत होईल तसेच या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध उपक्रम घेता येतील. जेणे करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल. आपले बालपणा पासूनचे गीतकार बनण्या पर्यंतचे किस्से ऐकविले. त्याचप्रमाणे गीताच्या मागचा इतिहास उलगडून सांगितला. सरावाशिवाय या गोष्टी साध्य होत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त सराव होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष सामंत दिगंबर यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तर यावेळी कार्यवाह विजय ठाकूर राजेश सामंत बाबा तळवडेकर सुधीर मळेकर, महेश ठाकूर, दीपक पाटकर असे संचालकही उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे नियोजन शैवाली परब यांनी केले. मुख्याध्यापक तानाजी काळे सर यांनीही गुरु ठाकूरवर लिहिलेली चारोळी सादर केली. पर्यवेक्षक सयाजी बोंदर आणि सर्व शिक्षक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिक्षकांनी विविध प्रश्न विचारून कार्यक्रमाचे रंगत वाढवली. मराठी दर्जा वाढविण्यासाठी विविध उपक्रम शाळेमार्फत राबविण्याचे गीतकार गुरु ठाकूर आणि शिक्षकानीही सुचविले.
